Thu, Aug 13, 2020 17:08



होमपेज › Kolhapur › महापौर, उपमहापौरांचे राजीनामे

महापौर, उपमहापौरांचे राजीनामे

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:38AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

 महापौर सौ. हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांनी मंगळवारी महासभेत आपापल्या पदाचा राजीनामा दिला. उपमहापौर माने यांनी महापौरांकडे, तर महापौरांनी सभागृहापुढे राजीनामा सादर केला. सर्वानुमते महापौरांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी महापौर फरास यांचा राजीनामा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, नूतन महापौरपदासाठी 22 डिसेंबरला निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

महापौर फरास यांच्या राजीनाम्याची माहिती नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी पुणे विभागीय कार्यालयाला दिली. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे पीठासन अधिकारी व महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. दरम्यान, काँग्रेसमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी अद्याप कुणाचेही नाव स्पष्ट झालेले नाही. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. सुरुवातीची अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर सध्या राष्ट्रवादीच्या फरास महापौर होत्या. फरास यांची मुदत 8 डिसेंबरला संपली. उपमहापौर माने यांचाही वर्षाचा कालावधी संपल्याने दोघांनी राजीनामा दिला. आता महापौरपद काँग्रेसकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाईल.

महापौरपदासाठी काँग्रेसमधून स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत; मात्र काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ महापौर व उपमहपौरपदाचे नाव निश्‍चित करणार आहेत.