Tue, Sep 22, 2020 07:55होमपेज › Kolhapur › माऊलीकडून कमलजित चितपट

माऊलीकडून कमलजित चितपट

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 1:09AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

रणहालगीच्या रांगड्या ठेक्यावर, तांबड्या मातीत तब्बल अर्धा तास अटीतटीने रंगलेल्या बेमुदत निकाली कुस्तीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा पै. माऊली जमदाडे याने पंजाबच्या धुमछडी आखाड्याचा हिंदकेसरी पै. कमलजितसिंह याला घिस्सा डावावर चितपट करून ‘महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती’ स्पर्धेचे आकर्षण असणार्‍या बेमुदत निकाली कुस्तीचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील ‘महापौर चषक कुस्ती’ किताब कौतुक डाफळे (पिंपळगाव) याने मिळविला.  त्याने सचिन जामदार (कोपार्डे)  याच्यावर 7 व्या मिनिटाला एकेरी पट काढून मात केली. या गटात तिसरा क्रमांक शुभम सिदनाळे याला मिळाला.  

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या व कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर गेले चार दिवस या स्पर्धेचा थरार रंगला. विशेष म्हणजे महिला कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवून यशस्वी कामगिरीसह कुस्तीशौकीनांची मने जिंकली. शुक्रवारी 
स्पर्धेतील प्रमुख लढती झाल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह मुंबई-पुण्यापासून ते संपूर्ण राज्यभरातून कुस्तीशौकिनांनी मैदानात दुपारपासूनच गर्दी केली होती. 

अर्धा तास रंगला मुख्य कुस्तीचा थरार
माऊली जमदाडे विरुद्ध कमलजितसिंह यांच्यातील मुख्य कुस्ती सुमारे अर्धा तास रंगली. पाचव्या मिनिटालाच दुहेरी पट काढून माऊलीने कब्जा घेतला होता. उलट्या बाजूने झोळी मारून खालून सुटण्याचा वारंवार प्रयत्न कमलजितसिंहकडून सुरु होता. मात्र, माऊलीने आपला कब्जा कायम ठेवला. विविध प्रकारचे डाव करत माऊलीने कमलजितसिंहला चितपट करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, कमलजितसिंहने सावध पवित्र्यात प्रत्येक डाव उलटून लावला. 10 मिनिटे झाली तरीही माऊलीची मगरमिठी कायम होती. 13 व्या आणि 15 व्या मिनिटाला कमलजितसिंहने सुटण्याचे प्रयत्न माऊलीने हाणून पाडले. 20 व्या मिनिटाला माऊलीने स्वारी मारून कमलजितच्या छाताडावर बसण्याचा प्रयत्न केला तोही त्याने फोल ठरविला. दरम्यान, दोन्ही पैलवान प्रचंड दमल्याने घामाघुम झाले होते. कमलजीतसिंहने माऊलीच्या कब्जात बसण्यास नकार दिला. यामुळे माऊलीने त्याला खाली पाडून त्याच्या पाठीवर स्वार झाला. पै. अशोक माने यांनी मैदानात धाव घेऊन कुस्ती पूर्ववत सुरू केली. 25 व्या मिनिटानंतर माऊलीने मानेला कस काढून कमलजितची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. 30 व्या मिनिटाला त्याने नौदल काढून घिस्सा डावावर कमलजितसिंहला चितपट करून उपस्थितांची मने जिंकली. 
अन्य वजनगटातील पहिल्या तीन क्रमांकाचे मल्‍ल असे : 86 किलो : अमित कारंडे (सावर्डे दुमाला), नवनाथ इंगळे (बार्शी), संतोष सुद्रीक (इचलकरंजी) 74 किलो : कुमार शेलार (कोतोली), स्वप्निल पाटील, राकेश तांबुळकर (पाचाकटेवाडी) 65 किलो : अक्षय हिरुगडे (बानगे), राकेश भोकरे (पट्टणकोडोली), क्रांतीकुमार पाटील (आमशी) 61 किलो : विजय पाटील (पासार्डे), सौरभ पाटील ( राशीवडे), संतोष हिरुगडे (बानगे) 57 किलो : भरत पाटील ( सोनगे), रमेश इंगवले (आनुर), विशाल पोवार (राशीवडे)

मान्यवरांच्या हस्ते गौरव
बक्षीस समारंभ शाहू महाराज यांच्या हस्ते आणि महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, मुंबईचे माजी खा. संजय दिना पाटील, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी,  उपमहापौर अर्जुन माने, रुस्तूम-ए-हिंद पै. दादू चौगले, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी विनोद चौगले,  स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. वहिदा सौदागर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. वनिता देठे, सभागृहनेता प्रवीण केसरकर, प्रभाग समिती सभापती सौ. प्रतीक्षा पाटील, अफजल पिरजादे, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजीत कदम, विजय सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरसेवक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, संजय मोहिते, भूपाल शेटे, लाला भोसले, सचिन पाटील, नगरसेविका सौ. उमा बनछोडे, दीपा मगदूम, सौ. शोभा कवाळे, सौ. निलोफर आजरेकर, सौ.माधुरी लाड, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक,  आर. के. पोवार,  माजी नगरसेवक आदील फरास, परिक्षित पन्हाळकर, सहायक संचालक नगररचना  धनंजय  खोत, केएमटी व्यवस्थापक संजय भोसले, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, परवाना अधिक्षक सचिन जाधव आदी उपस्थित होते. 

बक्षिसांचा वर्षाव
महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभागी मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणारी बेमुदत निकाली कुस्तीसाठी दोन्ही पैलवानांना 2 लाख 85 हजार रुपये विभागून देण्यात आले. याशिवाय 86 किलोवरील खुल्या गटातील ‘महापौर चषक’ विजेत्यास चांदीची गदा व 2 लाख, उपविजेत्यास 1 लाख, तृतीय क्रमांकास 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. महिला गटासाठी 50 हजार, 25 हजार, 15 हजार अशी बक्षिसांची रक्‍कम होती. याशिवाय इतर गटातील कुस्त्यांसाठी 5, 10, 15, 20, 25, 30 हजार रुपये व प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात आली.