इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
गेली पाच वर्षे सत्तेत मंत्री आणि पदवीधर मतदारसंघाचे १२ वर्षे नेतृत्व करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत. मात्र त्यांच्या काळात बेरोजगारी वाढली. पदवीधरांचे महामंडळ स्थापन करायला त्यांचा कोणी हात धरला होता का, असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत दादांचा पायगुणच असा आहे की ते जिथे जातात त्यांच्या कार्यक्रमच होतो, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.
शिक्षक आमदार होण्याची कोल्हापूरसाठी प्रथमच संधी आली आहे त्यामुळे जोराने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. इचलकरंजी येथील तोष्णीवाल गार्डनमध्ये पूणे पदवीधर व शिक्षण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व प्रा. आसगांवकर यांच्या प्रचारार्थ संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले की, पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे. त्यामुळेच अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगांवकर यांना निवडून देवूया, असे आवाहनही त्यांनी केले. याचबरोबर चंद्रकांत दादांना पदवीधरांच्या प्रश्नांवर बोलण्याचा अधिकारच नाही. असाही टोला मंत्री पाटील यांनी लगावला.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटातही शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन जीव धोक्यात घालून चांगले काम केले. पण त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण अधिकार्यांचे अधिकार कमी करण्याची आज गरज आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शिल्पकार हा कोल्हापूर जिल्हाच ठरेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उमेदवार प्रा.आसगांवकर, आमदार राजू आवळे, मदन कारंडे, महादेव गौड, बाबा पाटील, वि. ह. सपाटे, दादासाहेब लाड, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. स्वागत पी.डी. शिंदे यांनी तर प्रास्ताविक अशोक हुबळे यांनी केले. व्यासपीठावर रविंद्र माने, राहूल खंजीरे, संजय कांबळे, नितीन जांभळे, मुरलीधर जाधव, शेखर शहा, अमित गाताडे आदी उपस्थित होते.