Thu, Aug 13, 2020 16:10होमपेज › Kolhapur › गोव्याच्या अपहृत चौघांची सुटका

गोव्याच्या अपहृत चौघांची सुटका

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:41AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अपहरण झालेल्या गोव्याच्या चार तरुणांना शोधून काढण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’च्या पथकाने आजरा येथून मुलांना सुखरूप पोलिस मुख्यालयात आणले. कोल्हापूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोव्यातील राहुल दिलीप धारगळकर (वय 21), ज्ञानेश्‍वर कोकाकर (21, दोघे रा. धुळेर- म्हापसा), मनोज गावकर (20), सावळो गावकर (20, दोघे रा. मये) हे चौघे शुक्रवारी शिर्डी येथे देवदर्शनासाठी आले होते.

रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अपहृत राहुलच्या वडिलांना अज्ञाताचा फोन आला. हिंदी भाषेत बोलणार्‍या अपहरणकर्त्याने 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. ‘पैसे नहीं दिये तो लडकेको मार दूँगा,’ असे धमकावले. धारगळकर यांनी याची माहिती संकेश्‍वर पोलिसांना दिली. पोलिसांसोबत त्यांनी संकेश्‍वर, निपाणी परिसर पिंजून काढला. यानंतर अपहरणकर्त्यांनी जयसिंगपूर येथे बोलावल्याने याची माहिती कोल्हापूर पोलिसांना देण्यात आली.

पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जयसिंगपूर येथे रविवारी दुपारी सापळा रचला; पण अपहरणकर्त्यांनी ठिकाण बदलले. पुन्हा नृसिंहवाडीत बोलावून चकवा दिला. रविवारी दिवसभर अपहरणकर्ते पोलिसांसह पालकांना चकवा देत होते. सोमवारी सायंकाळपर्यंत हा प्रकार सुरूच होता.

दरम्यान, अपहरणकर्त्यांची माहिती पोलिसांनी मिळवली. सर्व संशयित रेकॉर्डवरील असल्याने त्यांच्या नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नातेवाइकांकरवी अपहरणकर्त्यांना फोन गेल्याने त्यांनी अपहरण झालेल्या चारही तरुणांना सोमवारी मध्यरात्री आजरा परिसरात सोडून पलायन केले.