Sat, Feb 29, 2020 13:31होमपेज › Kolhapur › कोल्हा'पूर'करांना दिलासा; पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट

कोल्हा'पूर'करांना दिलासा; पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट

Published On: Aug 09 2019 11:41AM | Last Updated: Aug 09 2019 11:33AM

पंचगंगा पाणी पातळीमध्ये घट होत असून महापूराचे पाणी पंचगंगा हॉस्पिटलपर्यंत सरले आहे.कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

गेल्या ८ दिवसापासून मुसळधर पावसाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले आहे. यंदाच्या पावसाने विक्रम निर्माण करत अनेकांना बेघर केले आहे. जिल्ह्यातील २०४ गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अद्यापही बचाव पथकांचे कार्य सुरू आहे. आज (ता.९) कोल्हापूर जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळाला आहे. पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट झाली आहे. त्यामुळे लवकरच पुर ओसरण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पात्रातून तब्बल चार फुट पाणी आल्याने वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे तब्बल ५ हजार ट्रक महामार्गावर अडकले आहेत. त्यामुळे वाहतूकीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र काल रात्री शिरोली टोल नाक्याजवळील होंडा शोरूम जवळ पाणी होते आज तिथुन पुढे तावडे हॉटेलकडे १०० मीटर पर्यंत पाणी ओसरले आहे. कदाचित आज रात्री हायवे खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात पूरस्थिती बिकट असून, या तीन तालुक्यांतील पूरग्रस्तांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याला चारी बाजूने पुराच्या पाण्याने ओढल्याने बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल तसेच लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सर्वांत कटू स्मृती असलेल्या २००५ च्या महापूराहून भीषण परिस्थिती ओढवली आहे. अलमट्टी धरणाचे तब्बल ५ लाख क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने पूर ओसरण्यास मदत होत आहे. पण दिवसभर रेड अलर्ट देण्यात आला आहे.