Sun, Mar 29, 2020 00:22होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक पावसाची नोंद

जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक पावसाची नोंद

Published On: Sep 29 2019 1:16AM | Last Updated: Sep 29 2019 1:16AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक पावसाची शनिवारी नोंद झाली. जिल्ह्यात 1 जून ते 28 सप्टेंबरअखेर एकूण सरासरी 2653.47 मि.मी.पावसाची नोंद झाली. 2005 साली 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत एकूण सरासरी 2652.31 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यावर्षी आजअखेर एक मि.मी.जादाच पाऊस झाला असून आजवरचा हा सर्वाधिक पाऊस मानला जातो.
जिल्ह्यात यावर्षी पावसाने हाहाकार उडवला. जून महिन्याचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला होता. नंतर सरासरी इतका पाऊस बरसणार अशी वार्ता आली. प्रत्यक्षात यावर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाला.

जून महिन्यातील पावसाची सरासरी 4 जुलैला ओलांडली. यानंतर पुन्हा काही काळ पावसाने ओढ दिली. यानंतर जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. जुलै महिन्यातील सरासरी पावसाने 31 जुलैला पूर्ण केली. त्यानंतर सहा ऑगस्टला ऑगस्ट महिन्यातील आणि त्यापुढच्याच दिवशी 7 ऑगस्टला या वर्षाची सरासरी ओलांडली. 

जिल्ह्यात एक ते नऊ ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस झाला. ढगफुटीसद‍ृश झालेल्या या पावसाने शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात महाप्रलयकारी असा महापूर आणला. या महापुराने हजारो कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. जिल्ह्याचे चार हजार कोटीहून अधिक नुकसान झाले. नऊ ऑगस्टपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. यानंतर सप्टेंबर महिन्यातही काही काळ जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात 2005 साली 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत एकूण सरासरी 2652.31 मि.मी. पाऊस झाला होता.उपलब्ध आकडेवारीवरून आजवरचा तो सर्वाधिक पाऊस मानला जात होता. मात्र, यावर्षी शुक्रवारी (दि.27 सप्टेंबर) या पावसाची बरोबरी झाली. दि.27 सप्टेंबरअखेर जिल्ह्यात एकूण सरासरी 2652.29 मि.मी.पावसाची नोंद झाली होती. आज जिल्ह्यात सरासरी 1.16 मि.मी. पाऊस झाला आणि आजवरच्या सर्वाधिक पावसाची यावर्षी नोंद झाली.

जिल्ह्यातील स्थिती

सरासरी पाऊस    1772.39 मि.मी.

जूनची सरासरी    337.79 मि.मी.(4 जुलैला ओलांडली)  

जुलैची सरासरी    757.42 मि.मी.(31 जुलैला ओलांडली) 

ऑगस्टची सरासरी    477.88 मि.मी. (6 ऑगस्टला ओलांडली)

सप्टेंबरची सरासरी    199.3 मि.मी. (7 ऑगस्टला ओलांडली)

 

जिल्ह्यातील पावसाची स्थिती

वर्ष    एकूण सरासरी पाऊस    टक्केवारी

2005    2652    150

2006    2492    141

2007    2234    126

2008    1859    105

2009    1714    97

2010    1716    97

2011    2015    120

2012    1534    86

2013    1779    100

2014    1491    84

2015    793    45

2016    1466    84

2017    1264    71

2018    1559    88

2019     2653    150