Mon, Jul 06, 2020 22:19होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : धामणी खोऱ्यात ‘मतदान’ बहिष्काराचा वणवा 

कोल्‍हापूर : धामणी खोऱ्यात ‘मतदान’ बहिष्काराचा वणवा 

Published On: Apr 19 2019 8:15PM | Last Updated: Apr 19 2019 8:15PM
कौलव (जि. कोल्‍हापूर) : राजेंद्र दा. पाटील

रस्ते धड न्हाईत, दवाखाना न्हाई, उन्हाळ्यात घशाला कोरड पडली तरी प्यायला पाणी न्हाई, पोटच्या पोरासारखी वाढीवलेली पिकं करपली, गुरा ढोरांची दावी कापायची येळ आली, कोण बी निवडून आलं तरी आमचा वनवास संपत न्हाई, मग आमी मतं कशासाठी दयायची? असा आर्त सवाल धामणी खोऱ्यातील घराघरातून घुमत आहे.

राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यांच्या साठ पेक्षा जास्‍त गावांत धामणी खोरा पसरला आहे. या भागाला वरदान ठरणारा साडेतीन टी.एम.सी.चा धामणी प्रकल्प गेली बावीस वर्ष रखडला आहे. अगदी डिसेंबरपासूनच या विभागाला पाणी पाणी म्हणायची वेळ येते. खेरीवडे पासून अंबर्डेपर्यत धामणी नदीवर जवळपास बारा ठिकाणी मातीचे समांतर बंधारे घालून पाणी अडवण्याचा केविलवाणा प्रयत्न येथील भूमीपुत्र करतात. 120कोटींचा धामणी प्रकल्प तब्बल 782 कोटीवर पोहोंचला आहे. सुप्रमा मिळाली व निविदाही निघाली, मात्र प्रकल्प पुन्हा कायदयाच्या कचाट्यात अडकला त्यामुळे बावीस वर्ष रखडलेल्या प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा टांगणीला लागले आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यात धगधगणाऱ्या अस्वस्थतेचा स्फोट झाला. जनतेने लोकसभा निवडणूकीवर बहिष्काराचे ब्रम्हास्त्र बाहेर काढून शासन यंत्रणा व लोकप्रतिनिधीनाच कचाट्यात पकडले आहे.

ऐन निवडणूकीच्या धामधुमीत धामणी खोऱ्यातील भूमीपुत्र पाण्यावाचून तडफडत आहे. पिके करपू लागली आहेत, पाणी आटल्यामुळे धामणीच्या पात्राचे वाळवंट झाले आहे. या वाळवंटातच जागोजागी खडडे मारून पाण्याचा शोध सुरू आहे. म्हासुर्ली चौधरींवाडी बंधाऱ्यानजीक थोडेफार पाणी आहे. म्हासुर्ली व अन्य वाडयांवर यात्रा आहे. त्यामुळे या पाण्याचा शेतीसाठी उपसा केलेला नाही. त्यामुळे पाण्यावर हिरवट तवंग पसरला असून कपडे धुण्यासाठी व पिण्यासाठी याच पाण्याचा आधार आहे. दुषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहे. कुंभारवाडी येथील कुपनलीकेवर अगदी सात आठ वर्षांच्या मुलींपासून युवक व वृध्द महिलांनी गर्दी केलेली असते. पाणी टंचाईचा यात्रांवरही परीणाम झाला असून जनावरांच्या पाण्याचा व वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागाला केवळ पाणीटंचाईचाच नव्हे तर अविकसितपणाचाही शाप आहे. एखादया रुग्णाला रात्री अपरात्री धामोड, कळे अथवा कोल्हापूरला पळवावे लागते.

या सर्व वेदनांनी तळमळणाऱ्या भूमीपुत्रांनी मतदानावर बहिष्कार टाकताच खडबडून जागे झालेल्या शासन यंत्रणेने भूमीपुत्रांची समजूत काढण्याचा केलेले प्रयत्नही फोलच ठरले आहेत. त्यामुळे आज (शुक्रवारी)या भागात कुठेही निवडणूकीचा अथवा प्रचाराचा मागमुसही दिसत नव्हता. विविध गावातील लोक बहिष्कारावर ठाम आहेत. धुंदवडे येथील धोंडीराम बापू कांबळे यांनी प्रत्येक निवडणूकीत नुस्ती आश्वासने देऊन फसवतात आता आम्ही भुलणार नाही. न्याय मिळाला नाही तर शासनाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. तर म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी येथील परशराम मोहिते, युवराज मोहिते या तरूणांनी आता मतदान बहिष्कारापासून मागे हटणार नाही असे सांगीतले.

अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पाची निविदाही निघाली आहे. त्यामुळे तुटेपर्यत न ताणता दबाव ठेऊन बहिष्कार मागे घ्यावा असा एक मतप्रवाह आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळात राधानगरी तालुक्यात दोन धरणे झाली. बारा आणे तालुका हिरवागार झाला. मात्र धामणी खोरा वर्षानुवर्ष मागासलेपणाच्या यातना भोगत आहे. अनेक निवडणुका झाल्या. मात्र जनतेच्या पदरात  आश्वासनापलीकडे काहीच पडले नाही. त्यामुळे आताच शासनाला भीमटोला दिला पाहीजे, असा सार्वत्रिक मतप्रवाह गावागावातून निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक अवध्या चार दिवसावर आली असतानाही धामणी खोऱ्यात बहिष्काराचा ज्वालामुखी धगधगत आहे. त्यामुळे शासन यंत्रणाही तणावाखालीच आहे.

आता माघार नाहीच !
धामणी खोऱ्याला कोणी वालीच न्हाई, धरण झाले नसल्याने रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पळावे लागते. प्यायला पाणीही मिळत नसलं तर निवडणूक अन मतदान तरी कशाला  पाहीजे?


शालाबाई मारूती पाटील (म्हासुर्ली)