Tue, Oct 20, 2020 10:52होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात 34 मृत्यू; 625 पॉझिटिव्ह

कोल्हापुरात 34 मृत्यू; 625 पॉझिटिव्ह

Last Updated: Sep 19 2020 7:23AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 34 बाधितांचा मृत्यू झाला असून, 625 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 895 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 38 हजार 382, तर मृतांची संख्या 1 हजार 215 वर पोहोचली आहे. समाधानकारक बाब म्हणजे, कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्यादेखील वाढत आहे. आजतागायत 26 हजार 257 व्यक्तींनी कोरोनाला हरविले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या मृत्यू संख्येमुळे जिल्हा प्रशासन हडबडले आहे.     शुक्रवारी 23 पुरुष आणि 11 महिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुक्यात कोरोनाबाधित 14 जणांचा मृत्यू झाला असून, यात इचलकरंजी शहरातील 4 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर शहर, करवीर, शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 4, कागल 2, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, सांगली येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृतांत समावेश आहे.

गुरुवारी घेतलेल्या 1 हजार 223 चाचण्यांपैकी 944 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, तर 279 जणांचे स्वॅब आरटी-पीसीआर व सीबीनॅटवर पॉझिटिव्ह आले आहेत, तर 329 जणांचे स्वॅब अँटिजेनवर तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये 269 जण निगेटिव्ह आले आणि 60 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खासगी लॅबमध्ये गुरुवारी 638 स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये 352 जण निगेटिव्ह आणि 286 पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांवर सीपीआरसह आयजीएम, आयसोलेशन, कोरोना केअर सेंटर, खासगी रुग्णालये आणि लक्षणे नसलेल्या; मात्र कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.

दिवसभरात 1 हजार 182 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. यामध्ये 1 हजार 389 जणांचे स्वॅब आरटी-पीसीआर, सीबीनॅट, तर 332 जणांचे अँटिजेनवर तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. शिरोळ, हातकणंगले, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, पन्हाळा, आजरा तालुक्यांत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील शासकीय रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये तपासणीच्या नोंदी अधिक प्रमाणात झाल्या आहेत. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे.

 "