Mon, Jan 18, 2021 09:47होमपेज › Kolhapur › आक्रोश... तणाव अन् संताप!

आक्रोश... तणाव अन् संताप!

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धोकादायक शिवाजी पुलावरून टेम्पो ट्रॅव्हलर नदीपात्रात कोसळून चिमुरड्या मुलासह 13 जणांच्या मृत्यूच्या घटनेमुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात शनिवारी हळहळ व्यक्‍त होत होती. केदारी कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगामुळे नातेवाइकांना शोक अनावर झाला होता.

नातेवाइकांसमवेत पहाटे केदारी दाम्पत्य कोल्हापुरात पोहोचले...पोलिस यंत्रणेसह मदतकार्यात तरुणांचा मोठा जनसमुदाय डोळ्यांसमोर दिसताच भरत केदारी यांना घटनेची तीव्रता लक्षात आली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला खरा; पण चिमुरड्या सानिध्यसह मुलगा, दोन सुना व सहा नातवंडांवर काळाने घाला घातल्याचे समजताच त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना.

डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. रुग्णालय आवारातील झाडाच्या कट्ट्यावर शून्यात नजर हरवून बसलेल्या केदारी यांना अन्य नातेवाईक सावरण्याचा प्रयत्न करीत होते. ‘काय देवाचं केलं होतं वाईट, एवढी मोठी शिक्षा द्यायला? उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह शववाहिकेच्या दिशेने नेत असताना केदारी व नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचा काळीज हेलावणारा होता.

शुक्रवारी रात्री भीषण घटना घडल्यापासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्‍वर पेठ, सिद्धार्थनगरसह परिसरातील असंख्य तरुण मंडळांचे कार्यकर्ते बचावकार्यात आघाडीवर होते. हा सारा लवाजमा दुपारपर्यंत शासकीय रुग्णालयात मदतकार्यात व्यस्त होता. नवीन शिवाजी पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर गरीब शेतकरी कुटुंबातील निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, अशी संतप्‍त प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांतून व्यक्‍त केली जात होती. 

महापौर स्वाती यवलुजे, माजी राज्यमंत्री आ. सतेज पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रवी चौगुले यांनी सकाळी साडेदहा वाजता शासकीय रुग्णालयात केदारी कुटुंबप्रमुखांची भेट घेऊन सांत्वन केले.

मृत चालकावर गुन्हा

या दुर्घटनेप्रकरणी टेम्पो ट्रॅव्हलरचा मृत चालक महेश लक्ष्मण कुचेकर (वय 45, रा. हिंजवडे, जि. पुणे) याच्याविरुद्ध शनिवारी सायंकाळी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातातून बचावलेल्या प्राजक्‍ता नांगरे (वय 18) हिने फिर्याद दाखल केली. गणपतीपुळे येथून कोल्हापूरकडे येत असताना टेम्पो ट्रॅव्हलर हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, सहायक निरीक्षक श्रीमती नाद्रेकर घटनेचा तपास करीत आहेत.