Sat, Feb 29, 2020 00:16होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषद अध्यक्ष निवड 21 डिसेंबरला

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड 21 डिसेंबरला

Last Updated: Dec 10 2019 1:18AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष,  उपाध्यक्षपदाच्या लांबलेल्या निवडीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. 21 डिसेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांचा विशेष मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित आहे. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल अडीच वर्षांचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकार्‍यांची मुदत 20 सप्टेंबर रोजी संपत होती. मात्र याच दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राज्यातील सर्वच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंचायत समिती सभापतींना मुदतवाढ देण्यात आली. ही वाढीव मुदत 20 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नोव्हेंबरमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी  21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता खास सभा बोलाविण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी प्रचंड चुरस होती. भाजप व काँग्रेसला सर्वाधिक प्रत्येकी 14 जागा मिळाल्या आहेत. मात्र सत्ता स्थापनेत भाजपने जनसुराज्य शक्ती, शिवसेना, स्थानिक आघाड्या व अपक्षांना सोबत घेऊन बाजी मारली आणि जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलविले. आघाडी करत असताना जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पदाधिकार्‍यांचा कार्यकाल सव्वा वर्षाचा निश्चित करण्यात आला होता. मात्र काठावरचे बहुमत असल्यामुळे भाजपने पदाधिकारी बदलाचे धाडस केले नाही. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसने एकत्र येत भाजपला राज्यातील सत्तेपासून बाजूला ठेवले. त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता असल्याने यावेळी जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखणे भाजपच्या नेत्यांसमोर आव्हान आहे.

भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुण इंगवले यांच्यासह प्रसाद खोबरे इच्छुक आहेत. या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडे पांडुरंग भांदिगरे, अरुण सुतार हे ओबीसीमधून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादीकडून जयवंत शिंपी, सतीश पाटील हे इच्छुक आहेत. असे असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये अद्याप पदांबाबतचे सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे राहणार यावर अध्यक्षपदाची नावे ठरतील.