Tue, Sep 22, 2020 09:55होमपेज › Kolhapur › कळेत सॉ मिलला शॉर्टसर्किटने भीषण आग

कळेत सॉ मिलला शॉर्टसर्किटने भीषण आग

Published On: May 15 2019 6:55PM | Last Updated: May 15 2019 6:36PM
कळे : वार्ताहर

कोल्हापूर गगनबावडा मार्गालगत कळे पन्हाळा येथील आशापुरा सॉ मिलला मंगळवारी (ता.१४) मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. या आगीत सुमारे पाच ते सहा गुंठा जागेत असणाऱ्या सॉ मिलमधील साहित्य, फर्निचरचे लाकूड सामान, सर्व मशिनरी, ट्रॅक्टर आदींसह संपूर्ण सॉ मिल जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळे पुलाजवळ  हिम्मतकुमार दामजी पटेल यांच्या मालकीची आशापुरा सॉ  मिल असून येथे लाकूड कापण्याची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. पटेल कुटुंबीय व कामगार झोपेत असल्याने सुमारे पंधरा ते वीस मिनिटानंतर त्यांना आग लागल्याचे समजले. पण सर्वत्र लाकूड साहित्य व जमिनीवर लाकडाचा भुसा  पडला असल्याने बघता -बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सॉ मिलमधील फर्निचर साठीचे लाकूड, लाकडाचे इतर साहित्य, कापणीच्या सर्व मशिनरी, ट्रॅक्टर व इतरत्र पडलेली लाकडे व लाकडी भुसा हे सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. 

सुमारे अर्धा तासानंतर पटेल कुटुंबीय कामगार व कळे ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. नंतर आग विजवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे तीन-चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर यांनी भेट देऊन पाहणी केली.