कोल्हापूर : मणकर्णिका कुंड उत्खननात आजअखेर सापडल्या ४५७ वस्तू, मेड इन जर्मनीची रिव्हॉल्व्हर; काडतूसे, प्राचीन मूर्त्या

Last Updated: Mar 08 2021 3:31PM
Responsive image
कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा

अवघ्या सहा ते सात इंच लांबीची 'मेड इन जर्मन' रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी ४५७ वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खनात सापडल्या आहेत. अजूनही उत्खनन सुरू आहे, त्यातही आणखी काही वस्तू आढळून येतील, या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा विचार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी २०१३ मध्ये पुरातत्वशी जे जे सुसंगत आहे, ते पुर्नजिवीत करा, जे जे विसंगत आहे, ते दूर करा असे आदेश दिले होते. त्यानंतर सुमारे ६५ वर्षांपूर्वी मुजविण्यात आलेला मणकर्णिका कुंड खुला करण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा महापालिकेच्या ताब्यात होती, ती जानेवारी २०२० मध्ये महापालिकेने देवस्थानला हस्तांतरीत केली. त्यानंतर जून २०२० पासून या कुडांचे उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानूसार पारंपरिक पद्धतीने उत्खनन केले जात असल्याचे जाधव यांनी सांगितले.

हा कूंड ६० बाय ६० फूट असा आहे. कुंडात उतरण्यासाठी दक्षिण आणि उत्तर बाजूने पायऱ्यांच्या दोन वाटा आहेत. या कुंडात ५० विरगळ आहेत तर पाच ओवऱ्या असल्याचे आतापर्यंतच्या उत्खननात आढळून आले आहे. कुंडाच्या चारही बाजूला शिवलिंग आहे. सुमारे १६ पाण्याचे झरे आढळले आहेत. आतापर्यंत साडे दहा मीटर पर्यंतचा गाळ काढलेला आहे, अजूनही तळ लागलेला नाही. सुमारे अडीच ते तीन फुटापर्यंत आणखी खाली गेल्यास तळ लागेल अशी शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

काचेचा कंदिल सुस्थितीत

या उत्खननात आतापर्यंत सुमारे ४५७ वस्तू आढळल्या आहेत. त्यात अंगावर पाच ठिकाणी शिवलिंग असलेली आणि घोड्यावर बसलेल्या पार्वतीची पितळेची दुर्मीळ मूर्ती आहे. मातीच्या सुमारे २५ विविध मूर्त्या आहेत. बौध्द किंवा जैन धर्माशी प्रथमदर्शनी साधर्म्य असलेली आणि केवळ चेहरा असलेली एक दगडी मूर्ती आहे. या उत्खननात काचेचा एक कंदिल आढळला. वैशिष्ट्यम्हणजे काचेचा हा कंदिल पूर्ण सुरक्षित असून काचेवर साधा ओरखडाही पडलेला नाही. अशीच छोटी गणपतीची मूर्तीही आहे. काही टाक आहेत तर सुमारे १३५ तांब्यांची नाणी आहेत. पितळेची टॉर्च, डबे, पेले अशाही वस्तू सापडल्या आहेत. तसेच आठ बुलेटचा संच, एक जिवंत छोटी बुलेट आणि काळ्या रंगाची मेड इन जर्मनी असा उल्लेख असलेली सहा सात इंचाची छोटी पण चालू असलेली रिव्हॉल्वर आढळून आली आहे.

उत्खननादरम्यान काढण्यात येणारी मातीही जतन केली जात आहे. ती वाळवून, चाळून घेतली जाणार आहे. त्यातही काही गोष्टी आढळण्याची शक्यता असल्याचे सांगत यासर्व वस्तूचे भाविकांसाठी संग्रहालय करण्याचा विचार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, अभियंता सुदेश देशपांडे, संशोधक उमाकांत राणिंगा, ॲड. प्रसन्न मालेकर आदी उपस्थित होते.