Mon, Jul 13, 2020 23:20होमपेज › Kolhapur › खारफुटी वनस्पतींचे जतन होतेय खार्‍या पाण्याशिवाय

खारफुटी वनस्पतींचे जतन होतेय खार्‍या पाण्याशिवाय

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:24AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : संग्राम घुणके

तामिळनाडूत 2004 त्सुनामीच्या भयानतांडवात खारफुटी जंगले जपलेलीच गावेच वाचली. त्यानंतर खारफुटी वनस्पतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. सागरी किनारपट्टीजवळील लोकवस्तीचा तटरक्षक म्हणून काम करणारी खारफुटीची जंगले सध्या धोक्याच्या पातळीत आहेत. शिवाजी विद्यापीठात ट्रेनर टेक्निकच्या सहाय्याने या वनस्पती गोड्या पाण्यातही जगविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे खार्‍या पाण्याशिवायही येथे खारफुटी वनस्पती वाढत आहेत. तसेच ‘इला जर्नल ऑफ वाईल्ड लाईफ फॉरेस्ट 2017’ मधून याबाबतचा शोधनिबंधही प्रसिद्ध झाला आहे.

मॅनग्रुव्हज व इतर खारफुटी वनस्पती ही समुद्र किनारपट्टी व खाडीच्या परिसरात एक मोठी परिसंस्था असते. समुद्रातील अनेक माशांच्या जलचरांच्या प्रजननाचे काम या झाडांच्या मुळांमध्ये होते. यामधील काही वनस्पतींचा औषधे व खाद्यान्‍नासाठीही उपयोग होतो.  मानवी हस्तक्षेपामुळे खारफुटीच्या परिसरात मोठी वृक्षतोड सुरू असून जलचर, सस्तन प्राणी यांच्या परिसंस्थेलाच धोका पोहोचत आहे. 

याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात याबाबत 30 वर्षांहून अधिक काळ संधोधन सुरू आहे. येथे विकसित केलेल्या तंत्रज्ञानानुसार कोकोपीट, माती, गार्डन सॉईल यासह ट्रेनर टेक्निक वापरून रोपवाटिकेत या झाडांची निर्मिती केली जात आहे. तसेच सुरुवातीला काही प्रमाणात खारे पाणी वापरले जाते. त्यानंतर गोड्या पाण्यात या वनस्पती वाढविल्या जातात. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात मॅनग्रुव्ह कॉर्नरमध्ये 16 प्रकारच्या खारफुटीच्या वनस्पतींचे जतन झाले असून यामधील काही झाडांना फुले आली आहेत. तसेच समुद्रफळ, इरापू, सुंदरी या वनस्पतींचे रोपवाटिकेत जतन होत आहे. याबाबत सॅप व युनायडेट नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत वनविभागाच्या सहाय्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात खाडीच्या 12 हून अधिक ठिकाणी या झाडांचे जतन व स्थानिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे.

खारफुटी म्हणजे काय?
समुद्र किनार्‍यालगत अथवा खाडीच्या प्रदेशात दलदलीच्या ठिकाणी आणि मुबलक क्षार असणार्‍या जमिनीत  वाढणार्‍या वृक्षवर्गीय वनस्पतींना ‘खारफुटी वनस्पती’ असे म्हणतात.

याबाबत  सुरू आहे संशोधन
चिपीच्या फळांपासून स्टार्च बाजूला करून उपयोग
कांदळापासून तंतू मिळविणे
तिवर, मारांडी या वनस्पतीपासून तेल 
वेगळे करून औषध व आहारात वापर

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  संशोधनातून 27 प्रकारच्या खारफुटी वनस्पतींचा आढळ
47 प्रकाराच्या मासे व जलचरांचा खारफुटी जंगलात अधिवास

अनेक वनस्पतींचा र्‍हास होतोय 

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असून येथे खारफुटीची जंगले ही देणगी मिळालेली आहे. अनेक औषधी गुणधर्म या वनस्पतीत आहेत. सध्या याचा र्‍हास रोखण्याची व याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. यांचे जतन झाले तरच किनारपट्ट्या वाचतील
- प्रा. डॉ. निरंजना चव्हाण, वनस्पतीशास्त्र विभाग