होमपेज › Kolhapur › तरुणीची आत्महत्या नैराश्यातून 

तरुणीची आत्महत्या नैराश्यातून 

Last Updated: Dec 10 2019 1:29AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील कॉलेज तरुणी कौसर नासिर नायकवडी (वय 17) हिने कसबा तारळे - दुर्गमानवाड रस्त्यावर मंदिरात केलेल्या आत्महत्येचे गूढ राधानगरी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी उकलले. कुटुंबीयांचा विरोध डावलून मित्र-मैत्रिणीसमवेत घराबाहेर जाऊन वाढदिवस साजरा केल्याने नात्यातील काही मंडळींनी रागावले. त्यामुळे निराश होऊन तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कौसरच्या मैत्रिणींसह मित्रांकडेही पोलिसांचा दिवसभर चौकशीचा ससेमिरा चालूच होता.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व ‘राधानगरी’चे पोलिस निरीक्षक तथा तपासाधिकारी उदय डुबल यांनीही सायंकाळी या वृत्तास दुजोरा दिला आहे. आत्महत्येच्या घटनेला 35 तासांचा कालावधी होऊनही राधानगरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. प्रभारी पोलिस उपअधीक्षक  डॉ. प्रशांत अमृतकर, तपासाधिकारी कदम यांनी तरुणीची आई, आजोबा व मामाची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, कौसरने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांना मानसिक धक्का बसला आहे. सायंकाळपर्यंत कोणीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनीही कुटुंबीयांची भेट घेतली.

पितृत्व हरविलेल्या कौसरसह चारही बहिणींचे आई, आजोबांनी मोठ्या कष्टातून संगोपन केले आहे. दोघींचा विवाह  झाला आहे. आजोबाची लाडकी असलेल्या कौसरचा घरात थाटात वाढदिवस साजरा करण्याचा कुटुंबीयांचा बेत होता. वाढदिवस असल्याने घराबाहेर जाऊ नकोस, असे तिला सांगण्यात आले होते. तरीही ती मैत्रिणीसमवेत कसबा तारळे - दुर्गमानवाड रस्त्यावरील एका मंदिरात गेली. दोन मैत्रिणी व मित्रांच्या उपस्थितीत केक कापून आनंद व्यक्त केला.

दुपारनंतरही कौसर घराकडे न परतल्याने आईने मोबाईलवरून तिच्याशी संपर्क साधला असता, तिने मैत्रिणी व मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करीत असल्याचे सांगितले. त्यावर आईने नाराजी व्यक्त केली. आजोबांनी वाढदिवसाची तयारी केली असतानाही तू घराबाहेर का गेलीस? अशी विचारणा केली. 

आधारासाठी केलास्टील डब्याचा वापर!

कुटुंबीयांतील अन्य सदस्य रागावल्याने कौसर निराश झाली होती. तिने मैत्रिणी, मित्रांना जाण्यास सांगितले. काही वेळाने तिने मंदिरातील घंटेला गळफास लावून आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. घंटा उंचीवर असल्याने हात पोहोचण्याकरिता आधारासाठी मंदिरातील स्टीलच्या डब्याचा वापर केल्याचेही तपासाधिकारी डुबल यांनी सांगितले.

मित्र-मैत्रिणींकडे चौकशीचा ससेमिरा

वाढदिवसाचा केक कापल्यानंतर मंदिर परिसरातील काही रहिवाशांनाही केक देण्यात आला होता. त्यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली. वाढदिवसाला उपस्थित असलेल्या मैत्रिणी, मित्रांकडेही दिवसभर चौकशी करण्यात आल्याचे डुबल यांनी सांगितले. चौकशीनंतर सायंकाळी मैत्रिणींना घरी सोडण्यात आले. तर वर्गातील मित्रांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलिस ठाण्यात थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल 

शासकीय रुग्णालयातील आठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेहाची इनकॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात गळफास घेतल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्तरीय तपासणीचा प्राथमिक अहवाल सायंकाळी उपलब्ध झाल्याचे उदय डुबल यांनी सांगितले.

संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दुर्दैवी तरुणी कौसर नायकवडी हिची आई अलमास, आजोबा इस्माईल, मामा व अन्य नातेवाईकांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर, तपासाधिकारी डुबल यांची भेट घेतली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालाची त्यांनी मागणी केली. कौसरने आत्महत्या केली नसून हा खुनाचा प्रकार आहे. त्यामुळे संशयितावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांनी मागणी केली. मंगळवारी सकाळी वकील व नातेवाईकांसमवेत पोलिस ठाण्यात समक्ष येऊन योग्य निर्णय घेऊ, असे कुटुंबीयांनी सांगितले.  

दरम्यान आमचा कसबा तारळे वार्ताहर कळवतो की, या  महाविद्यालयीन तरुणीवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी तिच्या सात मित्र-मैत्रिणींना ताब्यात घेण्यात आले असून दिवसभर त्यांच्याकडे जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. 

रविवारी कौसर वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मैत्रिणी आणि चार मित्रांसह गजानन महाराज मंदिरात गेली होती. पण दुपारच्या सुमारास याच मंदिरातील घंटेच्या हूकला गळफास घेतलेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह आढळला. सोमवारी पहाटे 4 च्या  सुमारास तिच्यावर कसबा तारळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दुपारी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कौसरच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.    राधानगरीचे पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी दिवसभर संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या सात जणांचे जाबजबाब घेतले. वरिष्ठ पातळीवर सर्व कॉल डिटेल्सही  तपासले जात असून सर्वांचे मोबाईल सील केले आहेत. शाहूवाडी निर्भया पथकाच्या पोलिस निरीक्षक शैलजा पाटील व राधानगरीचे पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी कौसरच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला. तसेच एफआयआर दाखल करण्यासाठी राधानगरीस येण्यास सांगितले. पण कुटुंबीयांची मानसिकता नसल्याने मंगळवारी एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. 

तारळे बाजारपेठ बंद

सोमवारी कसबा तारळे ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कौसरला श्रद्धांजली वाहिली. या घटनेत जे दोषी आढळतील, त्यांना कायद्याने कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने यावेळी करण्यात आली. कसबा तारळेसह परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.