Sun, Jul 05, 2020 02:54होमपेज › Kolhapur › काडय्या-इरय्या टोळीला ‘मोका’

काडय्या-इरय्या टोळीला ‘मोका’

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र, कर्नाटकासह गोव्यात दरोडे, जबरी चोरी, लूटमारसह जीवघेण्या हल्ल्याचे पन्नासवर  गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या हुक्केरीतील कुख्यात काडय्या-इरय्या टोळीतील 7 गुन्हेगारांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली.

‘मोका’ कारवाई झालेल्यांत टोळीचा प्रमुख काडय्या लिंबलिंगय्या पुजारी (वय 30, रा. बस्तवाड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), इरय्या चंद्रय्या मठपती (22, हेब्बाळ, हुक्केरी), कल्लाप्पा बाळाप्पा मेलमेट्टी (32, इंगळी, हुक्केरी), गुलाबसाब अप्पासाब मुलतानी (55, हंजानहट्टी, हुक्केरी), बसाप्पा गुरूसिद्धाप्पा मांग (55, हुक्केरी), मेहबूब बाबालाल मुलतानी (हंजानहट्टी) परशराम ऊर्फ परशू कैंचाप्पा मांग (बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.

टोळीविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, नेसरी, आजरा, कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, निपाणी, होस्पेट, कित्तूर, चिक्कोडी, हुक्केरी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे तपासाधिकारी रिजवाना नदाफ यांनी सांगितले.

टोळीचा म्होरक्या काडय्या, इरय्या व साथीदारांनी दि.22 डिसेंबर 2017  मध्ये लिंगनूर (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी व हनुमान दूध डेअरीचे दत्तात्रय पाटील व चाळू राजगोळ हे राष्ट्रीयीकृत बँकेतून मोठी रक्कम काढून संस्थेच्या कार्यालयाकडे परतत असताना जीवघेणा हल्ला केला होता. दोघांना अमानूष मारहाण करून 3 लाख 70 हजारांची रोकड हातोहात लंपास केली होती.

पोलिस उपअधीक्षक आर.आर.पाटील, सहायक निरीक्षक नदाफसह पथकाने टोळीचा छडा लावून काडय्या पुजारी वगळता अन्य सहाजणांना अटक केली होती. सर्व संशयित सध्या कारागृहात आहेत. सीमाभागात धुमाकूळ घातलेल्या टोळीविरुद्ध नेसरी पोलिसांनी ‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे दाखल केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी त्यास आज सकाळी मंजुरी दिली आहे.

महिला पोलिस अधिकारी रिजवाना नदाफ यांनी वर्षभरात नेसरीतील काळेधंदेवाल्यांसह गुन्हेगारांवर वचक ठेवला आहे. ‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव कौतुकास्पद आहे, असे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.