Wed, Aug 12, 2020 04:01होमपेज › Kolhapur › चांगभलंऽऽ जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस

चांगभलंऽऽ जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस

Last Updated: Apr 06 2020 11:02PM
जोतिबा ः पुढारी वृत्तसेवा

जोतिबा डोंगरावर चैत्रयात्रेला सुरुवात झाली असून  मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या सासनकाठ्या घेऊन येऊ नये, अशी विनंती जोतिबा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार आहे. जोतिबावर सर्वत्र शुकशुकाट असून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गोव्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा उत्साहात पार पडते. यावर्षी मात्र कोरोनाच्या सावटामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरीही यात्रेदिवशी भाविक येण्याची शक्यता असल्याने जोतिबा ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव सोमवारपासून तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. 

दरवर्षी यात्रेत मानाच्या 96 आणि बिगरमानाच्या सुमारे 700 सासनकाठ्या येतात; पण यंदा यात्रा रद्द केल्यामुळे सासनकाठ्या घेऊन येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य यात्रे दिवशी अनेक विधी-परंपरा पार पाडल्या जातात. श्री जोतिबाचा महाभिषेक शासकीय मंडळींकडून केला जातो. दुपारी दोन वाजता सासनकाठीचा छबिना निघत  असे; पण यंदा असा कोणताच धार्मिक कार्यक्रम होणार नाही. अन्नदान, प्रसाद वाटप असे अनेक कार्यक्रम राबवले जातात; पण यंदा हे सर्वच रद्द करण्यात आले आहेत.