Thu, Feb 27, 2020 23:14होमपेज › Kolhapur › जोतिबावर भाडे द्या अन् कोठेही पार्किंग करा

जोतिबावर भाडे द्या अन् कोठेही पार्किंग करा

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:13AM

बुकमार्क करा

जोतिबा : अमोल शिंगे

जोतिबा डोंगर येथे वाहनतळ व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवार्‍यामुळे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या जोतिबा बसस्थानक ते नवीन विश्रामगृह या दोन पदरी रस्त्याच्या उद्देशालाच तडा गेला आहे. जोतिबा डोंगरावर वाहनतळासाठी राखीव असणार्‍या जागा वाहनतळासाठी वापरतच नसल्यामुळे वाहनतळ व्यवस्थापनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी प. म. देवस्थान व्यवस्थापन समितीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

जोतिबा बसस्थानक ते नवीन विश्रामगृह हा रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे जोतिबावर वाढलेल्या वाहतुकीमुळे सेंट्रल प्लाझा परिसरामध्ये यात्रा काळात वाहतुकीची प्रचंड कोंडी व्हायची. या वाहतूक कोंडीचा जोतिबा यात्रेच्या एकूणच व्यवस्थापनावर ताण पडायचा. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकात पाटील यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला आणि यासाठी 5 कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. परंतु, सध्या चुकीच्या वाहनतळ नियोजनामुळे भाविक या रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत आहेत. यामुळे हा रस्ता परत वाहतूक व्यवस्थेसाठी अपुरा पडून पुन्हा वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. या परिस्थितीला कारणीभूत परिस्थिती म्हणजे जिल्हा प्रशासनाने वाहनतळासाठी आरक्षित केलेल्या जागाच वाहनतळासाठी अद्याप वापरत नाहीत. जोतिबा बसस्थानक आणि सेंट्रल प्लाझा समोरील गट क्रमांक 4 आणि यमाई मंदिराजवळील गट क्रमांक 5 हे देवस्थान व्यवस्थापन समितीचे असणारे गट जिल्हा आपत्कालीन विभाग आणि पोलिस विभागाने जोतिबा यात्रा नियोजन कृती आराखड्यात वाहनतळासाठी आरक्षित ठेवले आहेत. 

सध्या गट क्रमांक 4 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. यामुळे या जागेवर वाहनतळासाठी आरक्षित जागा म्हणून ज्या स्वरूपात वाहनतळाचे व्यवस्थापन व्हायला पाहिजे त्या स्वरूपात ते होताना दिसत नाही. फक्‍त चैत्र आणि श्रावण षष्ठी सारख्या मोठ्या यात्राकालातच तात्पुरती डागडुजी करून वाहनतळाची व्यवस्था केली जाते. मात्र एरव्हीच्या रविवार, पौर्णिमा सारख्या गर्दीच्या वेळी हे नियोजन विस्कळीत होत आहे.

सध्या प.म. देवस्थान व्यवस्थापन समिती जोतिबा डोंगरावर भाविकांकडून जागेचे भाडे म्हणून वाहनतळ कर वसूल करत आहे. जागेचे भाडे द्या आणि कोठेही गाडी पार्क करा, असे सध्या देवस्थान समितीचे वाहनतळ कारच्या बाबतीत धोरण आहे. यामुळे जोतिबा डोंगरावर अस्ताव्यस्त वाहने लावलेली दिसून येतात. त्याचबरोबर वाहने लावण्यावरून दुकानदार आणि भाविक यांच्यात बर्‍याच वेळा वाद निर्माण होतात. वाहनतळ करापोटी प.म.देवस्थान व्यवस्थापन समितीला वर्षाकाठी 40 ते 50 लाख एवढे उत्पन्‍न मिळते, त्यामानाने वाहनतळ व्यवस्थापनाच्या बाबतीत देवस्थान समितीचे कसल्याही पद्धतीचे नियोजन दिसून येत नाही.