Wed, Sep 23, 2020 01:52होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात सुट्टीदिवशी बंद पाळा;  अन्यथा कडक लॉकडाऊन

कोल्हापुरात सुट्टीदिवशी बंद पाळा;  अन्यथा कडक लॉकडाऊन

Last Updated: Jul 11 2020 1:23AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर शहरात दररोज रस्त्यावर होणारी गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाविषयी यत्किंचितही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. कोरोनाचा संसर्ग रोखून शहर सुरक्षित ठेवायचे असेल तर परिस्थिती पाहून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात यावा. अन्यथा सुट्टीच्या दिवशी शंभर टक्के बंद पाळण्यात यावा, अशी सूचना महापालिकेच्या स्थायी समिती सभेत काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख व अजित राऊत यांनी केली. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा झाली.

भाजी मंडई दिवसाआड सुरू करा...

कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे आवश्यक असतानाही शहरातील नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनात येत आहे. मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी. शहरातील भाजी मंडईसाठी वेळ ठरवून एक दिवस आड सुरू ठेवावी. सकाळी 9 ते दुपारी 1 अशी वेळ भाजी मंडईची करावी. दुकानाच्या बाहेरील गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाबाबत गांभीर्य काहीच राहिलेले नाही. लक्ष्मीपुरी भाजी मार्केट बंदच ठेवावे. दंडात्मक कारवाई करणार्‍या कर्मचार्‍यांना आयडेंटी कार्ड देण्यात यावे, असेही देशमुख व राऊत यांनी सांगितले.

प्रशासनाच्या वतीने केएमटीचे 200 कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून घेतले आहेत. प्रत्येक प्रभागात 2 कर्मचारी कार्यरत आहेत. नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून 63 हजार दंड वसूल केला आहे. महापालिकेची पाच पथकेही कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे, असे स्पष्ट करण्यात आले. चर्चेत नगरसेवक राजाराम गायकवाड, भूपाल शेटे, पूजा नाईकनवरे सहभागी झाले.

क्वारंटाईन केलेले नागरिक फिरताहेत रस्त्यावर

महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई करताना कर्मचार्‍यांना नागरिकांकडून दमदाटी होत आहे. संबंधित नागरिकांच्या गाडीवर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा. होम क्वारंटाईन करण्यात आलेले रुग्ण फिरत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी सूचनाही सभेत करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने नागरिक दमदाटी करत असतील तर मोबाईलवर त्यांचा फोटो काढून घेतला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद केला जाणार आहे. गुरुवारी एका नागरिकाचा व्हिडीओ तयार करण्यात आला असून गुन्हा नोंद करण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

 "