Fri, May 07, 2021 18:24होमपेज › Kolhapur › स्वस्त नशेचा तरूणाईला विळखा!

स्वस्त नशेचा तरूणाईला विळखा!

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:47AMकोल्हापूर ः राजेंद्रकुमार चौगले

गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, कोकेन, एमडी अशा अमली पदार्थांद्वारेच नशा करता येते, असे नाही तर सहज आणि अगदी माफक दरात उपलब्ध असलेल्या व्हाईटनर, बूट पॉलिश, स्टिकफास्ट, आयोडेक्स, नेलपेंट यांचाही नशेसाठी वापर केला जात आहे. शहरातील अडगळीत पडलेली ठिकाणे ही अशा प्रकारची नशा करण्याची अड्डा बनली आहेत. या स्वस्तात मिळणार्‍या नशेचा तरुणाईला अक्षरशः विळखा घातला आहे. कोल्हापुरातील शेंडापार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ सार्वजनिक ठिकाणी मोटारीत अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या दोन डॉक्टरांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केल्याने शहरात राजरोसपणे अमली पदार्थांचा नशाबाजार चव्हाट्यावर आलेला आहे. 

विक्रेत्यांनी काय घ्यावी खबरदारी
अठरा वर्षांवरील मुला-मुलींनाच व्हाईटनरची विक्री करावी. फक्‍त स्टेशनरीचा व्यवसाय करणार्‍यांना सुट्ट्या स्वरूपात ते द्यावे आणि अन्य लोकांना बाटलीऐवजी व्हाईटनर पेनची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 

250 प्रकारच्या अमली पदार्थांवर बंदी 
देशात जवळपास अडीचशे प्रकारच्या अमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, एमडी, काही कफ सिरप, कोकेन, अफीम अशांचा समावेश आहे. 
अडगळीत असलेली 

ठिकाणे गर्दुलेंचे अड्डे
एकदा अशा अमली पदार्थांचे सेवन करून झिंग आली की त्याचे रूपांतर अ‍ॅडिक्शनमध्ये कधी होते हे समजत नाही. नशेखातर ही मुले किरकोळ गुन्हेदेखील करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. शहरातील अनेक अडगळीत असलेली ठिकाणे गर्दुलेंचे अड्डे बनली आहेत. बर्‍याच वेळा नशा करणार्‍यांना पकडल्यानंतर पोलिसांनाच त्रास होतो. त्यांना नशा करण्यास मिळाली नाही तर ते त्रास देतात. त्यामुळे पोलिसांकडून देखील अनेकदा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. 

काय करतो अमली पदार्थ विरोधी सेल
पोलिसांकडे अमली पदार्थ विरोधी सेल आहे. या सेलकडून अमली पदार्थविरोधी सप्ताह राबविला जातो. त्यामध्ये शाळा महाविद्यालयांत जाऊन जनजागृती केली जाते. पण, व्हाईटनर व इतर गोष्टींची नशा करू नये, म्हणून काहीही लक्ष दिले जात नाही. सामाजिक संस्थांची मदत घेऊन या स्वस्तातील नशेकडे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अशी केली जाते नशा 
व्हाईटनर, बूट पॉलिश हे  रूमालावर घेऊन त्यांचा वास घेऊन ही मुले नशा करतात. त्यासाठी निर्मुष्य असलेली ठिकाणे ही त्यांचे अड्डे आहेत. तसेच ब्रेडवर आयोडेक्स लावून खाल्ले जाते. कफ सिरप एकावेळी एक बॉटल घेतली, तर नशा होते. 

आई-वडिलांनी काळजी घ्यावी 
अल्पवयीन व तरुण मुले लहानपणापासून आई-वडिलांबरोबर असतात. मात्र, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांच्या स्वभावात बदल होतो. त्यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास ते चिडचिड करतात. मुलांमध्ये अशा प्रकारचे बदल दिसल्यास आई-वडिलांनी अधिक सजग व्हावे. मुलगा कोठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत, ते काय करतात, अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे.

कुटुंबीयांना भोगावेलागत आहेत परिणाम
शाळकरी व अल्पवयीन मुले अशा वस्तूंचा नशेकरिता वापर करीत असल्याचे प्रकार अनेक वेळा उघड झाले आहेत. पण स्वस्तामध्ये मिळणार्‍या नशेच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या नशेमध्ये अनेक गरीब, अल्पवयीन अडकत चालले आहेत. त्याचे परिणाम त्यांच्यासह कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत.