जागतिक अपंग दिन - 'तिच्या' दिव्यांग पायाने जगण्याचं बळ दिलं! (video)

Last Updated: Dec 03 2020 3:29PM

शुक्ला बिडकरआंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क 

शुक्ला बिडकर मुळची करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावची. जन्मजात अपंगत्व तिच्या जगण्याची अडचण कधीच बनली नाही. तिची आई शोभा बिडकर आणि वडील साताप्पा बिडकर यांनी तिला आपल्या पायावर उभा राहायचं ठरवलं. दिव्यांग असताना करिअर कशामध्ये करायचं, हा सर्वात मोठा प्रश्न शुक्ला बिडकरच्या समोर उभा राहिला होता. पण, अवघड असणारे आणि खूप सारी मेहनत करावी लागणारे करिअर निवडले. 

दिव्यांगावर मात करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले. आपली पोर पायाने अपंग आहे, अशी खंत तिच्या आई-वडिलांना कधीच वाटली नाही. पॉवरलिफ्टींगमधील यशाने तिला आणखी जगण्याचं बळ मिळालं. पॉवरलिफ्टींगमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या, शिवछत्रपती एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार विजेती (२०१७) शुक्ला बिडकरची ही कहाणी. 

आपली शुक्ला स्वत:च्या पायावर चालावी, यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिला कोल्हापुरातील ऑर्थोपेडिक डॉ. दीपक जोशी यांच्याकडे नेले. त्यांच्या प्रयत्नामुळे सुरुवातीला तिला कुबड्या हातात घ्याव्या लागल्या. तिच्या पायावर शस्त्रक्रियाही झाली. पुढे मात्र, आत्मविश्वास, चालण्याचा प्रयत्न आणि औषधोपचार यामुळे शुक्ला स्वत:च्या पायवर चालू लागली. 

शिक्षणातही मागे नाही 

शुक्लाचे शालेय शिक्षण गावातच ज्ञानसागर भैरवनाथ विद्यालयात पूर्ण झाले. एमएलजी महाविद्यालयातून कला शाखेतून बारावी पूर्ण केली. पुढे कागलच्या वाय. डी. माने कृषी विद्यालयात कृषी पदविकाही पूर्ण केली. हे करत असतानाच संगणकाचेही शिक्षण घेतले. 

दिव्यांग खेळाडू बनले प्रेरणादायी  

वाचन करताना तिला कोल्हापुरातील जिल्हा अपंग संस्थेविषयी माहिती मिळाली. तिने या संस्थेला भेट दिल्यानंतर येथे ३ वर्षे क्लार्क म्हणून काम केले. अपंगत्वाचे दाखले देणे, रेल्वे पास, एस. टी. पास, शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम करू लागली. दरम्यान, अपंग खेळाडूंना ती स्पर्धेला घेऊन जाऊ लागली. हे सर्व करत असतानाच आपणही खेळावं, स्पर्धेला उतरावं, असं तिला वाटू लागलं. तिला बालपणापासूनच खेळाची आवड असल्यामुळे यातच आपण करिअर करायचं, असा दृढ निश्चय तिने केला. यासाठी तिला स्विमींग असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील आणि जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोवार यांचे प्रोत्साहन मिळाले. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तिने थाळीफेक, गोळाफेक व ॲथलेटिक्समध्ये (२०१०) अनेक पदके मिळवली. 

पुढे तिने पॅरालिम्पिकमध्ये प्रवेश करून सराव सुरू केला. सुरुवातीला तिला कधी शीरीरिक वेदना तर कधी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. पण, तिने हार मानली नाही. जुद्दीने सराव सुरू ठेवला. तिने आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ४१ पदके मिळवली आहेत. तिच्या दिव्यांग पायाने अनेक वजने लिलया पेलली. 

शुक्लाने जिंकलेल्या स्पर्धा - 

यवतमाळ, राज्य पॅरालिम्पिक स्पर्धा (२०१२) - एक सुवर्ण, तीन रौप्य

बंगळूर नॅशनल स्पर्धा (२०१२) - एक सुवर्ण, एक रौप्य, एक कास्य

नागपूर राज्य स्पर्धा (२०१३) - दोन सुवर्ण, एक रौप्य 

पुणे - राष्ट्रीय स्पर्धा (२०१३) - कास्यपदक 

नागपूर - राज्य स्पर्धा (२०१४) - रौप्यपदक 

नागपूर - राज्य स्पर्धा (२०१५) - सुवर्ण

नॅशनल पॅरापैॅवरलिफ्टींग चॅम्पियन सीप २०१५ - दिल्ली - सुवर्ण

बंगळुरू - नॅशनल पॅरापॉवरलिफ्टींग (२०१६) - रौप्य 

नागपूर - नॅशनल पॅरापॉवरलिफ्टींग (२०१७) - सुवर्ण 

नागपूर - नॅशनल पॅरापॉवरलिफ्टींग २०१८) - रौप्य 

नागपूर - नॅशनल पॅरापॉवरलिफ्टींग (२०१९) - रौप्य 

आजपर्यंत मिळालेले पुरस्कार - 

शिवछत्रपती एकलव्य राज्य क्रीडा ॲवॉर्ड (२०१७) 

शाहू साखर कागल ॲवॉर्ड (२०१७)

भागीरथी महिला ॲवॉर्ड कोल्हापूर (२०१७)

गृह दामिनी ॲवॉर्ड उजळाईवाडी (२०१७)

संयुक्त शिवजयंती ॲवॉर्ड दिंडनेर्ली (२०१८)

संभाजी ब्रिगेड ॲवॉर्ड सावर्डे (२०१८)

नवदुर्गा ॲवॉर्ड कोल्हापूर (२०१८) 

आस्था सामाजिक संस्था ॲवॉर्ड शाहूवाडी (२०१९)

यांचे मिळाले मार्गदर्शन -

शुक्ला बिडकरला क्रीडा क्षेत्रात बिभीषण पाटील, अनिल पोवार, प्रशांत पाटील, सारीका सरनाईक, आर डी आरळेकर, समरजितसिंह घाटगे, संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

शुक्ला म्हणते...

काही खेळाडूंची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे अनेक स्पर्धांना त्यांना मुकावे लागते. अशावेळी खेळाडूंना लोकनेत्यांनी जर प्रोत्साहन, मदत केल्यास दिव्यांग खेळाडू आपल्या राज्याबरोबरचं देशाचेही नाव उंचावतील. त्याचबरोबर, कोल्हापुरात पॉवरलिफ्टींगसाठी प्रशिक्षणाचा अभाव आहे. याकडेही लक्ष दिल्यास खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील, असे शुक्ला बिडकर म्हणते. भविष्यात मुलां-मुलींसाठी सामाजिक संस्था आणि स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करण्याचे तिचे स्वप्न आहे. सध्या तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे.