Sat, Jul 11, 2020 11:14होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत आणखी 3 रुग्ण

इचलकरंजीत आणखी 3 रुग्ण

Last Updated: Jul 01 2020 1:22AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजीतील रुग्णवाढ थांबता थांबेना झाली आहे. मंगळवारीही कुडचे मळ्याजवळील बाळनगर येथील दोघे, तर गुरुकन्‍नान नगरात आणखी एक रुग्ण आढळून आला. यामुळे वस्त्रनगरीतील बाधितांची संख्या 40 वर गेली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात एकूण 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या 851 वर गेली आहे.

कुडचे मळ्यातील बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचेअहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या सात दिवसांत इचलकरंजीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारीही त्यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. कुडचे मळा येथील बाधिताच्या संपर्कात आल्याने यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्‍तीची 25 वर्षीय पत्नी आणि 65 वर्षीय आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरुकन्‍नान नगर येथेही 35 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. 

गडहिंग्लजमध्ये एका 50 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरने गेल्या तीन-चार दिवसांत तपासलेल्या रुग्णांचा शोध घेतला जात असून, यामुळे गडहिंग्लजमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. चंदगड तालुक्यातील अडकूर येथेही रुग्ण वाढत चालले असून, आज 37 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राधानगरी तालुक्यातील कुडाळवाडी येथील 24 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथेही 29 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. आरूळ येथील 29 वर्षीय तरुण, तर पारले येथील 71 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. आजरा तालुक्यातील एक रुग्ण आढळला असून, सातारा जिल्ह्यातून आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दिवसभरात 11 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 851 वर गेली आहे. दिवसभरात चौघेजण कोरोनामुक्‍त झाले. त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या 720 इतकी झाली. जिल्ह्यात सध्या 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.