कागल : प्रतिनिधी
कागल विधानसभा मतदारसंघावर माझाच हक्क आहे. मला डावलणे म्हणजे माझ्यावरच नव्हे तर मतदारसंघातील भाजप, युतीचे कार्यकर्ते तसेच कागलच्या जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे ही निवडणूक आता कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानुसार गुरुवारी (3 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती छ. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
घाटगे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा. ही जागा भाजपला मिळावी. ते शक्य नसेल तर यापूर्वी चर्चा झाल्याप्रमाणे शिवसेनेचा एबी फॉर्म मला देऊन माझी उमेदवारी निश्चित करावी, अन्यथा मला मतदारसंघातील जनतेच्या एबी फॉर्मवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल.
कागलच्या जागेवर माझाच हक्क असल्याने या जागेवर शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक लढवावी, असेही मुख्यमंत्री व पालकमंत्री तसेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेअंती ठरले होते. 28 सप्टेंबरला त्याची घोषणा होणार होती; परंतु दिवसभरात काय घडामोडी झाल्या याचे कोडे मलाही पडले आहे. त्यातून अनपेक्षितपणे शिवसेनेकडून कागलच्या जागेवर एबी फॉर्म देण्यात आला. या राजकीय प्रक्रियेचा मी बळी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
समरजितसिंह म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना युती होणारच होती. या पार्श्वभूमीवर भाजपचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी जाहीर करण्याची केवळ औपचारिकता बाकी होती. परंतु युतीच्या चर्चेत शिवसेनेच्या आग्रहास्तव कागलची जागा शिवसेनेला सोडण्यात आली.
विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी मला पाठबळ दिले होते. उमेदवारीचे नियोजनही झाले होते. मुख्यमंत्र्यांनी अनेकदा माझ्या उमेदवारीचे संकेत दिले होते.
महाजनादेश यात्रेमध्ये माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबही झाले होते. गेल्या साडेतीन वर्षांत मतदारसंघात रात्रंदिवस सक्रिय होऊन कामे केली आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविल्या आहेत. मतदारसंघात विकासाचा अजेंडा घेऊन नवोदिता घाटगे आणि मी मतदारसंघ पिंजून काढला आहे. अनेक कामे मार्गी लावली आहेत, असेही ते म्हणाले.