Sat, Feb 29, 2020 20:06होमपेज › Kolhapur › शहरात चुकीच्या सूत्रानुसार जाचक घरफाळा

शहरात चुकीच्या सूत्रानुसार जाचक घरफाळा

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:43PMकोल्हापूरः सतीश सरीकर 

कोल्हापुरात महापालिकेच्या वतीने भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारला जात असला तरी त्यातील सूत्रे चुकीची आहेत. परिणामी घरफाळ्यातील जाचक सूत्र बदलणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत क्रीडाईने सविस्तरपणे केलेल्या अहवालात व्यक्‍त केले आहे. तसेच अहवालात वाणिज्य वापरातील घरफाळा दुरुस्तीचे विविध प्रस्ताव देण्यात आले आहेत. राज्यातील तेरा महापालिकांकडून सध्या आकारण्यात येत असलेल्या मिळकत कराबाबतची (घरफाळा) माहिती माहिती अधिकाराकात घेऊन क्रीडाईने हा अहवाल तयार केला आहे.

कोल्हापूर शहरात निवासी व वाणिज्य अशा मिश्र मिळकती आहेत. दोन्ही प्रकारच्या इमारतीमध्ये भाडेकरूच्या ताब्यात अनिवासी वापरासाठी असलेल्या बर्‍याच मिळकती या शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका, विमा कंपन्या, नोंदणीकृत कार्यालये किंवा कार्पोरेट ऑफिससाठी वापरात आहेत. पालिकेने भाडेकरूच्या ताब्यातील मिळकतीचे भांडवली मूल्य निश्‍चित करताना घेतलेल्या सूत्रामध्ये त्रुटी दिसून येतात. मुद्रांक शुल्क मूल्यांकनाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये भाडेकरू असलेल्या इमारतीचे खरेदीदस्त प्रकरणात मूल्यांकन ठरविण्यासंबंधी विशिष्ट परिस्थितीसाठी वेगवेगळी सूत्रे दिली आहेत. 
भाडेकरूच्या ताब्यात असलेले एकूण क्षेत्र हे मालमत्तेमध्ये नियमाप्रमाणे अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रापेक्षा जास्त असलेल्या मिळकतीसंबंधीचे सूत्र विचारात घेतले आहे. सूत्र सरसकट कुळाच्या ताब्यातील सर्व मिळकतींना लागू करणे योग्य नाही. महापालिकेने या सूत्राचा आशय विचारात घेतलेला नाही. मुद्रांक कार्यालयाच्या सूत्रामध्ये मासिक भाडे विचारात घेतले आहे. मात्र, महापालिकेच्या विनियमामध्ये वार्षिक भाडे विचारात घेतले आहे. दोन्ही बाबीत भांडवली मूल्य ठरविण्याचा हेतू असताना मासिक भाड्याऐवजी वार्षिक भाडे पुन्हा विनियमामध्ये का घेतले आहे याची स्पष्टता होत नाही. ज्या मिळकतीबाबत अधिकृत प्रत्यक्ष भाडेमूल्याची माहिती उपलब्ध होत असेल अशा मिळकतीसंबंधी भांडवली मूल्य ठरविणे व त्यावर आधारित कर आकारणी करणे हे जास्त रास्त व वाजवी होईल. नागरिकांनाही स्वीकारण्यास अडचण वाटणार नाही. नांदेड किंवा औरंगाबादमध्ये वापरण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार वाणिज्य घरफाळा आकारणी होणे गरजेचे वाटते.  

2018-19 साठी सुचविलेले दुरुस्तीचे प्रस्ताव...
शहरातील बहुमजली इमारतीमधील वाणिज्य किंवा व्यापारी वापराच्या मिळकतीवर कर आकारणी भांडवली मूल्यावर आधारित करण्यास हरकत नाही. परंतु, कर आकारणीचे प्रमाण 0.1 टक्‍का ते 1.0 टक्‍का या मर्यादेमधील कमाल 0.20 टक्क्यापर्यंत सामान्य कर आकारण्याबाबत विचार करण्यात यावा. भाडेकरूच्या वापरातील वाणिज्य, व्यापारी वापराच्या मिळकतीबाबत भांडवली मूल्य निश्‍चित करताना सिद्धगणकातील मार्गदर्शक सूचनामधील जे सूत्र विचारात घेतले आहे ते भाडेकरूंच्या ताब्यात असलेले एकूण क्षेत्र हे त्या मालमत्तेमध्ये नियमाप्रमाणे एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रापेक्षा जास्त असेल अशा प्रकरणी फक्‍त विचारात घेण्याचे आहे, याबाबत महापालिकेने फेरविचार करावा. सिद्धगणकनुसार भाडेकरूच्या ताब्यातील मिळकतीचे भांडवली मूल्य काढण्यासाठीच्या सूत्रांचा खुलासा होणे आवश्यक आहे. मासिक भाड्याऐवजी वार्षिक भाडे का? विचारात घेतले आहे याचा बोध होत नाही. किंबहुना ही बाब अयोग्य आहे. महापालिका कर आकारणी विनियम क्र. 18 मधील तरतुदीचे अवलोकन करता सिद्धगणकातील मार्गदर्शक सूचनावर विनियमातील तरतुदींचे प्राबल्य असेल असे नमूद असल्यामुळे सदर मार्गदर्शक सूचना अधिनियमान्वये आणि विनियमान्वये भांडवली मूल्य निश्‍चित करण्यासाठी लागू होणार नाहीत. 

या नियमाचा योग्य तो विचार करून भांडवली मूल्य ठरविण्याच्या सूत्रामध्ये योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी. भाडेकरूच्या ताब्यातील मिळकतीचे भांडवली मूल्य मूल्याकंन शास्त्रानुसार विचारात घेऊन ठरविण्यात यावे. शहरातील वाणिज्य किंवा व्यापारी वापराखालील मिळकतीचे प्रमाण तुलनेने फारच थोडे असल्यामुळे वेगळ्या सूत्रानुसार भांडवली मूल्य निश्‍चित करण्यात यावे. 

कूळ वापरातील घरफाळ्यात बदल आवश्यक...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरातील कूळ वापरातील अनिवासी मिळकतींच्या घरफाळ्याची राज्यातील तेरा महापालिकांतील माहिती अहवालासाठी घेण्यात आली आहे. त्यावेळी राज्यातील इतर ‘ड’ वर्ग महापालिकांपेक्षा तब्बल सातपट घरफाळा कोल्हापूर महापालिका आकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 व महाराष्ट्र महापालिका अधिनियम 2012 यांचा सखोल अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. कूळ वापरातील मिळकतीचे भांडवली मूल्याचे सूत्र चुकीची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने जाचक कर वसूल करण्यात येत आहे. ही बाब खूपच गंभीर असल्याने त्याचा विचार होऊन त्यात बदल करावा, असेही अहवालात म्हटले आहे. 

...या समितीने केला अहवाल तयार
क्रिडाईचे अध्यक्ष मोहन यादव हे अहवाल तयार करणार्‍या समितीचे सल्‍लागार आहेत. चेअरमन प्रकाश देवलापूरकर आहेत. अजय कोराणे, प्रसाद भिडे, विलास रेडेकर, शंकर गावडे, अण्णासाहेब अथणे, शाम नोतानी, राहुल देसाई, मुकेश चुटाणी, प्रणय मुळे आदींचा समितीत समावेश आहे. 

शहरातील मिळकती
निवासी इमारती - 
1, 16, 323
वाणिज्य इमारती 
29, 290
एकूण इमारती 
1, 45, 613