होमपेज › Kolhapur › भागातील ‘सेवकां’चा दर वधारला

भागातील ‘सेवकां’चा दर वधारला

Published On: Apr 17 2019 2:06AM | Last Updated: Apr 17 2019 1:04AM
कोल्हापूर : विकास कांबळे

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा काऊंटडाऊन सुरू झाल्याने आता प्रत्यक्षात फोडाफोडीला वेग येऊ लागला आहे. यामुळे भागातील ‘सेवकां’चा दरही आता वधारू लागला असून, ‘लाख’मोलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मंडळांकडेही उमेदवारांनी आता थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, आपले निवडणूक चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पाकिटां’चा आधार घेण्यात येऊ लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता चांगलाच उडू लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये जसा बदल झाला आहे त्याप्रमाणे प्रचार यंत्रणेतही खूप मोठा बदल झाला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा करणे, गावातील प्रमुख लोकांच्या बैठका घेणे, काही कारणास्तव बाजूला गेलेल्यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचे काम झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात छोट्या-छोट्या सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे यानिमित्ताने जेवणावळी सुरू होतात. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जातात. शेवटच्या चार, पाच दिवसांत प्रत्येक घरामध्ये निवडणूक चिन्ह पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरात दि. 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी केवळ चार तेे पाच दिवसच मिळणार असल्याने उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात मतदारांना, मंडळांना खूश करण्यासाठी ‘लक्ष्मी’चे दर्शन घडविले जाते. त्याची आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत असल्या गोष्टी पूर्वी फारशा चालत नसत. मात्र, यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरस चांगलीच वाढली आहे. त्यामुळे धोका पत्करण्यासाठी कोणी तयार नाही. 

प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांचा डोळा गठ्ठा मतदानावर असतो. ही मते प्रामुख्याने झोपडपट्टीमध्ये असतात. शहरात 70 ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. त्या मतदानाकडे उमेदवारांनी आपला मोर्चा वळविला आहे. पोट भरण्याच्या मागे लागलेल्या येथील लोकांना निवडणुकीचे फारसे काही नसते. मतदानाच्या आदल्या दिवशी ‘पाकिटा’तून कोण निवडणुकीचे चिन्ह घरी पोहोचवेल तोे या लोकांचा पक्ष आणि तो या लोकांचा उमेदवार. काहीवेळाने जर वजनदार व्यक्‍ती कोणते चिन्ह घेऊन आली, तर या लोकांचा तो पक्ष आणि तो उमेदवार. याची जाणीव राजकारण्यांनादेखील असते. त्यामुळे ते याचा फायदा घेतात; पण काही मंडळींच्या आता हे अंगवळणी पडले आहे. जोपर्यंत चिन्हाचे ‘पाकीट’ येत नाही, तोपर्यंत ही मंडळीदेखील वाट पाहत असतात. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी दिसू लागली आहे. भागामध्ये मंडळांचा प्रभाव कमी-अधिक असतो. काही मंडळे गल्‍लीपुरती मर्यादित असतात, तर काही मंडळांचा संपूर्ण परिसरात प्रभाव असतो. त्यांच्यामुळे नक्‍कीच मतांवर फरक पडत असल्याने आता मंडळांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत..