पावसाचे थैमान

Last Updated: Oct 21 2019 1:40AM
Responsive image
कोल्हापूर ः ताराराणी चौक ते सीबीएस रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. पाण्यातून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत होती. 2) परीख पूल परिसरात कंबरेएवढे पाणी साचले होते. (छाया ः तय्यब अल

Responsive image

कोल्हापूर : प्रतिनिधी
शहरात रविवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले.  सायंकाळी अवघ्या 40 मिनिटांत 18 मि.मी. पावसाची नोंद झाली. धुवाँधार पावसाने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. घरे, दुकानांसह अनेक ठिकाणी इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शहरासह जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसाने पंचगंगेच्या पातळीतही चार फुटांनी वाढ झाली.

शहरासह जिल्ह्यात शनिवारपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला. पहाटे तर अनेक भागांत धुवाँधार पाऊस झाला. रविवारी सकाळी काही काळ पाऊस झाला. यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने शहरात दुपारनंतर पावसाची तीव—ता वाढली. काही वेळात पावसाने थैमान घातले.

रस्त झाले जलमय

दुपारी चारच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. काही वेळात त्याचा जोर इतका वाढला, की काही अंतरावरीलही दिसत नव्हते. पावसाचे मोठे थेंब पडत होते. पाहता पाहता शहरातील अनेक रस्त्यांना पावसामुळे नाल्याचे स्वरूप आले. रस्त्यावरून पाण्याचे लोट  वाहत होते. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचत गेले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहराच्या अनेक भागांत पाणी साचले. परीख पुलाखाली सुमारे दोन ते अडीच फूट पाणी साचले. या पाण्यातून मार्ग काढताना अनेक चारचाकी बंद पडल्या. यामुळे काही गाड्या पाण्यात अडकून राहत होत्या. स्थानिक तरुणांच्या मदतीने त्या बाहेर काढल्या जात होत्या. पाणी पातळी वाढल्यानंतर मात्र पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली. 

व्यापारी, फेरीवाल्यांचे नुकसान

या परिसरातील विचारे कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील दुकान गाळ्यात पाणी शिरले. बसस्थानकावरील बहुतांश फेरीवाल्यांचे यामध्ये साहित्य असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. बसस्थानकावरील निम्म्याहून अधिक खाद्यपदार्थांच्या गाड्या रविवारी बंद राहिल्या.

ठिकठिकाणी पाणी साठले

राजारामपुरी परिसरातही ठिकठिकाणी पाणी साचले. जनता बझार चौकासह पहिल्या गल्‍लीत पाणी साचले होते. यामुळे खाऊ गल्‍लीतील खाद्यपदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झाला. राजारामपुरी मुख्य रस्त्यावरूनही वेगाने पाण्याचे लोट वाहत येत होते. त्यासोबत मोठ्या प्रमाणात कचराही होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले होते.साईक्स एक्स्टेंशन या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

ताराराणी चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ताराराणी चौक ते वीरशैव बँकेपर्यंत रस्त्यावर पाणी होते. याच पाण्यातून चौकातून बसस्थानकाकडे वाहतूक सुरू होती. यामुळे वाहने गेल्यानंतर रस्त्याकडेच्या दुकानात पाणी जात होते. हे पाणी बाहेर काढताना दुकानदारांना कसरत करावी लागत होती. दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर आदी ठिकाणीही पाणी साचले होते. महावीर उद्यान ते स्टेशन रोड या मार्गावर तीन ठिकाणी गुडघाभर पाणी होते. या मार्गावरील केव्हीझ पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पेट्रोल पंपनजीक रस्त्यावर इतके पाणी साचले होते, की गेल्या दोन महिन्यांपूर्वीच्या महापुराची आठवण येत होती. या परिसरातील पाणी काही दुकाने, घरे तसेच परिसरातील इमारती, रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये शिरले. यामुळे बेसमेंटला पार्किंग केलेली वाहने या पाण्यात बुडाली होती.

वाहनचालकांची कसरत

महावीर उद्यान ते महावीर कॉलेज या मार्गावर पाणी असल्याने त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. एरव्ही दोन मिनिटांचा हा रस्ता पार करण्यासाठी आठ ते दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांच्या दालनाकडे जाण्यासाठीही चारचाकी वाहनांचा वापर करावा लागला. जयंती नाल्याच्या पुलावर दोन्ही बाजूला पाणी साचले होते. सीपीआर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावर तर गुडघाभर पाणी होते. सीपीआर चौक, दाभोळकर कॉर्नर, पार्वती टॉकीज आदी परिसरातही पाणी साचले होते.

आठवडा बाजाराची दैना

लक्ष्मीपुरीत रविवारी आठवडा बाजाराची पावसाने दैना उडवली. सायंकाळनंतर पाऊस सुरू झाल्याने मंडईतील गर्दी कमीच झाली. यानंतर काही वेळातच मंडईला तळ्याचे स्वरूप आले. मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने या परिसरातील तीन रस्ते जलमय झाले. फोर्ड कॉर्नर येथेही पाणी साचले होते. या परिसरात काही दुकानात साचलेले पाणी शिरले. कोंडा ओळ, धान्य बाजार परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी होते. दुधाळी परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते. शहरातील मैदाने, बागा यांनाही तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी गटारी, नाले तुडुंब भरून रस्त्यावरून वाहत होते. शहरासह उपनगरातही अनेक भागात अशीच अवस्था होती.

नागरिकांचे हाल

पावसाने बाजारपेठा, दुकाने ओस पडली. खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचेही हाल झाले. महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी रोड आदी प्रमुख मार्गांवर दुपारी नागरिकांची गर्दी होती. मात्र, पावसाने अनेकांनी घर गाठणे पसंत केले. पावसापासून बचाव करण्यासाठी जागा मिळेल तिथे लोक थांबून होते. अनेकांनी तर तासाभरापेक्षा अधिक वेळ आडोशाला उभारून काढला. दुकानात गर्दी होती मात्र खरेदीपेक्षा पाऊस जाण्याचीच अनेक जण वाट पाहत थांबले होते. बाजारपेठा, मंडईतही अशीच अवस्था होती.

रिक्षा, बस वाहतूक यावर परिणाम

पावसाचा जोर इतका होता, की काही वेळातच बहुतांश रिक्षाथांबेही ओस पडले. अनेकांना रिक्षाही मिळत नव्हत्या. अशीच अवस्था केएमटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची झाली होती. शहरातील बहुतांश मार्गावर केएमटी खचाखच भरून धावत होत्या. मात्र, पावसाने केएमटीचेही वेळापत्रक कोलमडून टाकले. प्रवासी, पर्यटक, भाविकांसह शहरातील व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले यांचेही पावसाने हाल झाले. दिवाळीच्या तोंडावर खरेदीसाठी दुकानात सजावट करण्यात आली होती, दुकानाबाहेर विक्रीसाठी साहित्य ठेवले होते. काहींची सजावट खराब झाली. विक्रीसाठी बाहेर ठेवलेले साहित्य सुरक्षितस्थळी हलवताना व्यापारी, विक्रेत्यांची दमछाक झाली.

सुमारे तासाभरानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पावसाने उसंत घेतली. मात्र, ती काहीवेळासाठी राहिली. रात्री पुन्हा पावसाला प्रारंभ झाला. अर्धा तासाहून अधिक काळ बरसल्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरातील वाहतूक सुरळीत झाली, तसेच खरेदीसाठी दुकानात गर्दी झाली. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असूनही ती तुलनेने कमीच होती. सायंकाळी रंकाळा टॉवर परिसरातील एका घराची भिंत कोसळली. या घरात कोणी राहात नसल्याने जीवितहानी झाली नसल्याचे अग्‍निशमन दलाने सांगितले. 

पंचगंगा पातळीत वाढ

दरम्यान, दोन दिवसांच्या पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ झाली. शनिवारी पंचगंगेची पातळी 8.4 फूट इतकी होती. रविवारी सकाळी आठ वाजता ती 10.10 फुटांपर्यंत वाढली. दुपारी चार वाजेपर्यंत ती 12.6 फुटांपर्यंत वाढली होती. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 33 मि.मी. पावसाची नोंद झाली. कागल तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली. आजर्‍यात 38 मि.मी., हातकणंगले, शिरोळमध्ये प्रत्येकी 37 मि.मी., पन्हाळ्यात 36 मि.मी., शाहूवाडीत 35 मि.मी., राधानगरीत 31 मि.मी., करवीरमध्ये 30 मि.मी., भुदरगडमध्ये 29 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 28 मि.मी., गनबावड्यात 23 मि.मी., तर चंदगडमध्ये 21 मि.मी. पावसाची नोंद झाली.

जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाला. राधानगरी वगळता सर्वच धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे शनिवारी झालेल्या पावसाने पुन्हा पाणीसाठ्यात वाढ झाली. यामुळे राधानगरीसह 11 धरणांतून पाण्याचा कमी प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी, कासारी, कडवी, पाटगाव व चिकोत्रा या धरणातून वीजनिर्मितीसाठी, तर कोदे, जांबरे, घटप्रभा, जंगमहट्टी, चित्री व तुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. वारणा, दूधगंगा आणि कुंभी धरण पूर्ण क्षमतेने भरले असले, तरी या परिसरात तुलनेने काहीसा कमी पाऊस झाला. यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही.

शहरात भयावह वातावरण

रविवारी दुपारी झालेल्या पावसाने शहरात भयावह वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी ढगाळ वातावरण झाले. हे वातावरण इतके दाट होते, की दुपारी साडेचार-पाचच्या सुमारासच शहरात अंधार पडल्यासारखी परिस्थिती होती. अंधार्‍या वातावरणाने वाहनचालकांना लाईट लावून वाहन चालवावे लागत होते. पाऊस सुरू झाल्यानंतर हे वातावरण आणखीच भीतीदायक झाले. विजांचा कडकडाट आणि पावसाची मुसळधार आणि ठिकठिकाणी प्रचंड वेगाने वाहणारे पाण्याचे लोंढे यामुळे शहरात भयसद‍ृश वातावरण तयार झाले होते.

जयंती नाल्याला रौद्ररूप

पावसाने जयंती नाल्यात इतक्या वेगाने पाणी येत गेले, की केवळ तासाभरात जयंती नाल्याची पातळी आठ ते दहा फुटांनी वाढली. उद्यमनगर ते दसरा चौकापर्यंत जयंती नाल्याने अक्षरश: रौद्ररूप धारण केले होते. प्रचंड वेगाने, खळाळत पाणी वाहत होते. जयंती नाल्याचे हे भीतीदायक रूप पाहण्यासाठी विल्सन पूल, संभाजी पुलावर नागरिकांची गर्दी झाली होती. दुधाळी नाल्यालाही काही काळ रौद्ररूप आले होते.