Thu, Feb 20, 2020 17:30होमपेज › Kolhapur › 122 वर्षांच्या सेवा रुग्णालयाच्या पायाला धोका

122 वर्षांच्या सेवा रुग्णालयाच्या पायाला धोका

Published On: Jul 05 2019 1:31AM | Last Updated: Jul 05 2019 12:09AM
कोल्हापूर : संतोष पाटील

कसबा बावडा, लाईनबझार येथील सेवा रुग्यालय या 122 वर्षांपूर्वीच्या इमारतीखालून पाण्याचे लोट वाहत आहेत. रस्ते विकास प्रकल्पांतर्गत चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची वाढविलेली उंची व अशास्त्रीय पद्धतीने नाला बांधणीमुळे शाहू कालीन इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुरत आहे. इमारतीच्या पूर्वेकडून शिरलेले पाण्याचे लोट पश्‍चिम बाजूने बाहेर पडत आहेत. वेळीच लक्ष न दिल्यास   इमारतीचा पाया ठिसूळ होण्याचा धोका आहे.  महापालिकेने जलद गतीने हालचाल करून इमारत परिसरात येणार्‍या पाण्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. 

राजर्षी शाहू महाराज यांनी गोर-गरीब जनतेला रुग्णसेवा मिळावी, या उद्देशाने आताच्या सेवा रुग्णालय असलेल्या व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटलची पायाभरणी 1897 ला केली. अत्यंत प्रशस्त जागेत दगडी इमारतीमध्ये गेली 122 वर्षे रुग्णसेवा सुरू आहे. येथे रोज सरासरी 250 बाह्यरुग्णांची तपासणी होते. महिन्याला 35 ते 40 महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. एक्स-रे , ईसीजीसह नियमित असणार्‍या सर्व रक्‍त तपासण्या होतात.  माता, जन्मजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने शासकीय रुग्णालयाचा लाभ प्रसूतीसाठी व्हावा, त्यासाठी केंद्र शासनाचा लक्ष्य हा उपक्रम राबविला. राज्यभरातील 123 शासकीय रुग्णालयांचे गुणांकन केल्यानंतर सेवा रुग्णालयात लक्ष उपक्रमात 97 टक्के गुण मिळाले.  राष्ट्रीयस्तरासाठी सेवा रुग्णालयाची निवड झाली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रुग्णालयांसाठी असणार्‍या कायाकल्प उपक्रमात स्वच्छतेच्या बाबतीत सेवा रुग्णालयाने 98.2 टक्के गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला. 

आतापर्यंत रुग्णसेवेत आघाडीत राहून गेली 122 वर्षे भक्‍कमपणे उभी असलेली ही इमारत महापालिकेच्या गलथानपणामुळे धोकादायक होऊ शकते. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्तगत रस्त्यांची उंची वाढल्याने शहराची प्लिंथ लेव्हल (जमीन स्तर) दीड ते दोन फुटांनी वाढली. रस्त्यावरील पावसाचे पाणी वहनासाठी नाल्यांची बांधणी निकृष्ट दर्जाची झाली. याचा फटका या ऐतिहासिक इमारतीला बसत आहे. रुग्णालयाच्या पूर्व बाजूला बांधलेल्या नाल्यातून पाणी जात नाही. हे सर्व पाणी संरक्षक भिंतीमधून इमारतीच्या आवारात येते. आवारात पाण्याचे पाट वाहत असतात. पाऊस थांबल्यानंतरही नाल्यातून झिरपणारे पाणी जमिनीत मुरत ते मुख्य दगडी इमारतीच्या पश्‍चिम भागातून बाहेर पडत आहे. गेली चार वर्षे हे पाणी येत आहे. पाण्यामुळे शाहू कालीन इमारतीचा पाया ठिसूळ होण्याचा धोका आहे.