Mon, Jan 18, 2021 10:45होमपेज › Kolhapur › 'म्हणून मला मिळाले ग्रामविकास मंत्रिपद'

'म्हणून मला मिळाले ग्रामविकास मंत्रिपद'

Last Updated: Jan 11 2020 1:32PM

मुरगुड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार करताना प्रविणसिंह पाटील, भैय्या माने,राजेखान जमादार, दिग्विजयसिंह पाटील, रणजित सुर्यवंशी, गणपतराव फराकटे आदि.  (फोटो :मुदाळतिट्टा (कोल्‍हापूर) : प्रतिनिधी

साडे चौदा वर्षांच्या काळात मला ज्या खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, त्या सर्व खात्यामधून मी सर्वसामान्य, गरजू, निराधार, आजारी लोकांची सेवा केली. यामुळेच मला पुन्हा ग्रामविकास हे मंत्रिपद मिळाले. आता पुन्हा पाच वर्षं या पदावर काम करायला मिळाल्याने राज्यातील अठ्ठावीस हजार खेडी, दोन लाख शेहचाळीस हजार किलोमीटरचे रस्ते अशा विस्तीर्ण प्रदेशाचा विकास करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या खात्याचे जाणीवपूर्वक काम करुन महाराष्ट्र राज्य ग्राम विकासामध्ये देशात नंबर वन बनवू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुरगुड (ता‌.कागल) येथे राष्ट्वादी काँग्रेस पक्ष व प्रविणसिंह पाटील गटाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील तर प्रमुख उपस्थितीत खासदार प्रा. संजय मंडलिक होते.

मुश्रीफ म्हणाले की,  १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात ज्या शेतकऱ्यांची कर्जे थकीत आहेत अशांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तर ज्यांनी कर्ज प्रामाणिकपणे फेडले आहे त्यांना जास्तीत- जास्त अनुदान द्यायचे धोरण ठरले आहे. पूरग्रस्तांना जास्त मदत कशी होईल याचा विचार सुरू आहे. कमालीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

 मुरगुड, शिंदेवाडी, यमगे या तिन्ही गावातील पिण्याच्या पाण्या संदर्भात मुश्रीफ म्हणाले, प्रथम पूर्ण क्षमतेने जनतेला पाणी पुरवठा करा. मग शेतीसाठी वापरा. तुमच्या शेतीसाठी पाणी वापरायला आमचा विरोध नाही. तुम्हीच जर उतावळेपणा दाखवून वेदगंगा नदीतून पाणी उपसा करा, असे म्हणत असाल तर तुम्ही तुमच्या शेतीसाठी नदितून पाणी उपसावे.  पाणी टंचाईवेळी लोक आपल्या विहीरी देतात आणि हे वेगळा सल्ला देतात. जनतेला पाणी मिळाले पाहिजे यासाठी तलावाची  जी किंमत असेल ती द्यायला मी तयार आहे. पाणीटंचाई प्रश्नाबाबत तलाव मालकाच्या मातोश्रीची मी, खासदार संजय मंडलिक, प्रविणसिंह पाटील भेटू व त्यांना विनंती करु‌.

 यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले,  देशातील एक ही तलाव खासगी मालकीची राहिला नसताना मात्र मुरगूड येथील सर पिराजीराव तलाव हा खासगी मालकीचा आहे. पाणी टंचाई प्रश्नी जिल्हाधिकारी यांनी माहिती मागीतली आहे. यावर मुश्रीफ, प्रविणसिंह पाटील आणि मी लवकरच समाधानकारक तोडगा काढू. खासदारकी, आमदारकी, नामदारकी जिंकून वर्ल्डकप जिंकला आहे. आता गोकुळ दूध संघ, जिल्हा बँकेच्या ट्वेंटी_ट्वेंटी म‌‌ॅच बाकी आहेत. त्याही खेळू आणि सगळी बक्षिसे कागलमध्‍ये आणू आणि  मुश्रीफ यांच्या सहकार्याने कागल एक वैशिष्ट्यपूर्ण तालुका म्हणून विकसित करू.

प्रविणसिंह पाटील म्हणाले, राज्यात गेल्या पाच वर्षांत कोणत्या पध्दतीने राजकारण केले याचा विचार सर्वसामान्य जनतेने केला पाहिजे. तरुणांनो येथून पुढे निवडणुकीवेळी भावनिक खूळचटपणा करू नका. विचार करुन निर्णय घ्या. मुरगूडच्या पाणीप्रश्नी तलावाचा पाण्याचा हक्क कदापीही सोडणार नाही. या तलाव उभारणी प्रसंगी लोकांनी जमिनी दिल्या, वेठबिगारीतून उभारणी केली. पाणी हे आमच्या हक्काचे आहे. विकास कामाचा डोंगर, कार्यकर्ते उभा करणारा, जनतेची चोवीस तास सेवा करणारा सेवेकरी हसन मुश्रीफ यांची कदापिही साथ सोडणार नाही हे स्पष्ट केले.

स्वागत दिग्विजयसिंह पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेळी मुश्रीफ, खासदार मंडलिक यांचा प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्‍यात आला. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, डी. डी. चौगले, सुधीर सावर्डेकर, नामदेव भांदिगरे यांची भाषणे झाली. महापौर सूरमंजिरी लाटकर, सुहासिनीदेवी पाटील, सभापती विश्वासराव कुराडे,भैय्या माने, बंडोपंत चौगले, गणपतराव फराकटे, नामदेव राव मेंडके, धनाजीराव गोधडे, सुनिल चौगले, शशिकांत खोत, दिपक सोनार, विकास पाटील, कागल, मुरगूड न. पा. चे नगरसेवक, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. आभार रणजित सुर्यवंशी यांनी मानले.