Fri, Jul 10, 2020 17:36होमपेज › Kolhapur › #Women’sDayबाई असले तरी हमालीतच जीव रमायचा

#Women’sDayबाई असले तरी हमालीतच जीव रमायचा

Published On: Mar 08 2018 12:44PM | Last Updated: Mar 08 2018 12:44PMकोल्हापूर: महादेव कांबळे

सायंकाळ झाली की, कोल्हापूर-गारगोटी मार्गावर आयटीआय कॉलेजजवळ घ्या मेथी, घ्या दोडका, घ्या मुळा असा बाईचा टीपेला जाणारा आवाज ऐकू येतो. सायंकाळी त्या आवाजाच्या दिशेनं माणसांची मोठी गर्दी दिसते, त्या गर्दीत भाजी देत, हिशोब लावत, चेहर्‍यावर निरागस हसू देत गोकुळा सगळ्यांबरोबर बोलत असते आणि हिशोब लावत असते.

माहितीतील एखादा माणूस जेव्हा तिला विचारतो मावशी हमाली सोडून इथं जीव रमतो का? तेव्हा या प्रश्नावर ती मनमुरादपणे हसत म्हणते हमालीसारखा इथं जीव रमत नाही. लाडक्या जाऊन चुकला, नाहीतर इथं, कोण कशाला येतं? लाडक्या म्हणजे त्यांचा एकुलता एक बैल. बैल असला तरी घरातील एका व्यक्तिप्रमाणे होता. म्हणून गोकुळा विचारते हमाली सोडून इथं कोण? कशाला येतं? हा ती लगेच प्रतिप्रश्न करते. आणि पुन्हा एकदा हसत हसत गोकुळा मावशी आपल्या जुन्या आठवणी सांगते.

गोकुळा नामदेव कोंडारे यांचे मुळगाव बार्शी, सध्या कळंब्याजवळील झोपडपट्टीत राहतात. सोलापूर जिल्ह्यातून कामासाठी म्हणून  पंधरा वीस वर्षापूर्वी कोल्हापुरात सारं कुटुंब अालं. काम शोधण्यापेक्षा नामदेव कोंडारेंनी हमाली सुरू केली. कधी धान्याच्या दुकानात, कधी सिमेंटच्या दुकानात, तर कधी पडेल तिथे हमाली करीत राहिले. सोबतीला एक बैलगाडी. चौघांचं जगणं एकट्या नामदेव कोंडारे यांच्यावर. परिस्थितीमुळं लहान मुलं नकळत्या वयातच मोठी झाली, म्हणून मग नामदेव आणि पत्नी गोकुळा दोघंही कामावर जाऊ लागली. नामदेव कोंडारे घर चालवण्यासाठी दिवसरात्र राबू लागले. नेहमीप्रमाणे एक दिवस हमाली करताना, अपघात झाला. पाठीच्या मणक्याला मार लागला आणि घर चालवणार्‍या नामदेवरावांची हमाली कायमची थांबली.

नामदेव यांची हमाली थांबली. खाणार्‍या पोरांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. नामदेव यांच्या औषधांचा खर्च वाढला. डाॅक्टरांना भेटल्याशिवाय पर्याय राहिला नाही. असे एक ना अनेक प्रश्न गोकुळासमोर उभा राहिले. मदतीचे, सहकार्याचे सगळे पर्याय नाहीसे झाल्यावर मात्र गोकुळानं बैलाचा कासरा हातात धरला, आणि हमालीसाठी सिमेंटच्या दुकानासमोर बैलगाडी लावली. दुकानाचे मालक, ग्राहक गोकुळाकडे बघत राहिले, त्यांनी प्रश्न विचारण्याआधीच गोकुळानं ५० किलोची सिमेंटची पिशवी पाठीवर मारून हमाली करायला सुरूवातही केली होती.

नवर्‍याच्या अपघातानं ओझ्याचं पोतं पाठीवर आलं, असं गोकुळा सांगत असताना तिच्या चेहर्‍यावरचा अानंद मात्र तसूभरही कमी झालेला नसतो. जीव असेपर्यंत राबायलाच पाहिजे की? नाही तर खाणार काय, कुणाच्या जीवावर आणि कशाला एैश करा? जीवात जीव असेपर्यंत काम करणं आणि पोरांना आनंदी बघणं हेच खरं आनंद देणारं काम आहे असंही ती सांगते. तेव्हा ती आणखी खुलते आपल्या कामाचं सगळं शेड्यूल्ड सांगत राहते.

गोकुळा आता भाजीपाला विकते. महागाईनं सगळ्यांचच कंबरडं मोडलय हेही ती सांगायला विसरत नाही. ओझं उचलण्यापेक्षा हे काम सोपय, बसून काम करता येतं म्हटल्यावर गोकुळा मावशी गुडघ्यावर हात ठेऊन म्हणते, नकारार्थी हात हलवत नाही नाही म्हणत या कामात दम नाही असं ती दिलखुलासपणे सांगते. काम ओझ्याचं नाही खरं गुडघे राहत नाहीत, हमालीसारखं सुख ह्यात कुठंय? हमालीमध्ये रमतो तसा जीव ह्यात रमत नाही रे म्हणत किटलीमधून आणलेल्या चहाची आॅफर देत चला, चला गिर्‍हाईक अालं म्हणते आणि हात जोडून निरोप घेते.

लाडक्या घराचा आधार

कोंडारे घरात राबणारे जसे माणसांचे चार हात होते, तसेच कायम कामात असणारे चार पायही होते. ते चार पाय म्हणजेच लाडक्या. सगळ्या घराचा डोलारा लाडक्या नावाच्या बैलावर. एक दिवस अचानक लाडक्या अजारी पडला आणि त्यातच तो गेला. लाडक्या गेल्याचं दुःख सगळ्या घराला झालं. घराचं उत्पन्न थांबलं आणि त्याच्या जाण्यानं घरही थांबलं. गोकुळा म्हणते तो गेल्यावर राबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातच मालक आजारी म्हणून भाजीपाला विकायला सुरूवात केली, नाहीतर मी हमाली सोडली नसती असंही ती सांगते.