Fri, May 07, 2021 18:40
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढांचा धुव्वा! सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचा विजयी झेंडा

Last Updated: May 05 2021 8:28AM

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा ‘गोकुळ’च्या ईर्ष्येने झालेल्या लढतीत महादेवराव महाडिक, आ. पी. एन. पाटील, अरुण नरके (मनपा) यांच्या तेहतीस वर्षांच्या अभेद्य सत्तेला आज सुरुंग लागला. पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलने 21 पैकी 17 जागांवर दणदणीत यश मिळवीत ‘गोकुळ’वर विजयाचा झेंडा फडकावला. अवघ्या चार जागा राखता येऊन सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचा धुव्वा उडाला. ‘गोकुळ’मधील सत्तांतराने नवी राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील (गोकुळ) माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांची 33 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने 21 पैकी 17 जागांवर दणदणीत यश मिळवत विजयाचा झेंडा फडकावला. 

संपूर्ण राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या असताना केवळ 39 सहकारी संस्थांसह जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचाच निवडणूक कार्यक्रम न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू राहिला. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सत्ताधारीच न्यायालयात गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. अखेर सर्व अढथळे पार करून झालेली निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाला संपूर्णपणे कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीने झालेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे परिणाम पुढील सर्वच निवडणुकांत दिसणार आहेत. 

रविवारी, 2 मे रोजी झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली. अनुसूचित जाती-जमातीगटातून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, इतर मागासवर्गीय गटातील अमरसिंह यशवंत पाटील व भटक्या व विमुक्त जाती गटातून बयाजी शेळके हे विरेाधी आघाडीचे उमेदवार विजयी झाले. आणि ‘गोकुळ’च्या सत्तांतराची नांदी झाली. विरोधी आघाडीचा उत्साह वाढला, तर मतमोजणी केंद्रातील सत्ताधारी समर्थकांच्या चेहर्‍यावर चिंता उमटली. 

महिला गटात सत्तारूढ गटातून अनुराधा पाटील-सरूडकर व शौमिका महाडिक, तर विरोधी आघाडीकडून सुश्मिता पाटील व अंजना रेडेकर नशीब आजमावत होत्या. सुमारे दोन तासांत अनेकवेळा मतमोजणी केंद्रात अनेकांचे श्वास रोखून धरायला लावणारे आकडे सातत्याने वर-खाली होत होतेे. एका फेरीत तर चारही उमेदवारांना 427 ते 429 अशी समान मते होती. केवळ दोन मतांचा फरक कोणाच्या विजयाची रेषा पार करणार, याची उत्सुकता क्षणोक्षणी ताणली जात होती. अखेर विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर यांनी महिला गटातील आपल्या विजयाची मोहर उमटवली आणि उर्वरित तीन उमेदवारांमध्ये विजयासाठी रस्सीखेच सुरू झाली. अनुराधा पाटील की शौमिका महाडिक अशी दुसर्‍या जागेसाठी चुरस होती. विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सौ. सुश्मिता यांची मते कमी होती. मतमोजणीत शौमिका महाडिक यांनी बाजी मारली आणि सत्ताधारी आघाडीला विजयाचा पहिला गुलाल लागला. 

पाच जागांपैकी चार जागा विरोधकांना मिळाल्याने विरोधकांचे मनोबल वाढले होते. सत्ताधारी गटाला एक जागा मिळाल्याने सिंगल व्होटिंगच्या आधारावरच सत्ताधारी गटाचे उमेदवार विजयी होणार, अशी चर्चा मतमोजणी केंद्रावर सुरू झाली. यानंतर सर्वसाधारण गटातून 16 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली. 25-25 मतांचे गठ्ठे करून नऊ फेर्‍यांमध्ये सुमारे आठ तास मतमोजणी चालली. 

एका मतपत्रिकेवर 33 उमेदवार आणि सोळा मते असल्याने प्रत्येक मतपत्रिका पाहून त्याची नोंद करण्यास वेळ लागत होता. त्यातच या गटात मोठ्या प्रमाणावर पॅनेल टू पॅनेल मतदान न होता क्रॉस व्होटिंग झाल्याने मतमोजणीला अधिक वेळ लागत होता. 

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विरोधी पॅनेल नऊ, तर सत्ताधारीचे सहा उमेदवार आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या मतांतील अंतर केवळ दहा ते पंचवीस एवढेच होते. यातही विरोधकांची सरशी असल्याने त्यांना आपल्या विजयाची खात्री वाटू लागली. दुसर्‍या फेरीअखेर हाच ट्रेंड कायम राहत मतांचे अंतर 50 पर्यंत पोहोचले. मतमोजणीची तिसरी फेरी विरोधकांना विजयाकडे घेऊन जाणार, हे स्पष्ट करणारी ठरली. कारण, या फेरीत विरोधकांच्या उमेदवारांची संख्या नऊवरून बारापर्यंत वाढली.तर सत्ताधार्‍यांची संख्या सहावरून चारपर्यंत घसरली. पुढच्या फेरीत विरोधकांनी सरशी करत एका जागेचे मताधिक्य वाढवले. ती संख्या तेरावर गेली. तर सत्ताधार्‍यांना तीनच ठिकाणी आघाडी घेता आली. त्यामुळे काही सत्ताधारी समर्थकांनी हाच निकाल समजून काढता पाय घेतला. अखेर हीच आघाडी नवव्या फेरीपर्यंत थोड्याफार मतांचा फरक वगळता कायम राहिली आणि याच संख्याबळावर शिक्कामोर्तब करत गेली 33 वर्षे अभेद्य असलेल्या ‘गोकुळ’ या बलाढ्य आर्थिक गडावर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विजयाचे निशाण फडकावले.

खात्रीचे रूपांतर चिंतेत

आजवर अभेद्य असलेल्या ‘गोकुळ’ गडावर विरोधकांना कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळीही ती मिळणार नाही याची खात्रीच सत्ताधारी आघाडीला होती. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्यासह सहा संचालक मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. सुरुवातीला त्यांच्यात विनोदी चर्चेतून हास्याचे फवारे उडत होते. राखीव गटातील निकाल जाहीर झाल्यावर विनोदाची जागा चिंतेने घेतली. सर्वसाधारण गटातील कल स्पष्ट होताच निकाल जाहीर होण्यापूर्वीच यातील बहुतांशी संचालकांनी मतमोजणी केंद्र सोडणे पसंद केले. 

मंडलिकांना मोठा फटका

संजय मंडलिक यांच्या लोकसभा निवडणुकीपासून राजकीय ध—ुवीकरणाला सुरुवात झाली. ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन राज्यभर गाजली. मंडलिक खासदार झाले. मात्र, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव विरेंद्र आणि बहीण सुश्मिता यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

दोन माजी अध्यक्ष जिंकले, दोन पराभूत

विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे हे दोघे माजी अध्यक्ष विरोधी पॅनेलकडून लढले आणि विजयी झाले. तर विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे तसेच माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील सत्तारूढ आघाडीकडून लढले; मात्र ते पराभूत झाले.

चेअरमनपदाचे दावेदार

अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील, नाविद मुश्रीफ.

विजयी उमेदवार

 सर्वसाधारण गट (सोळा जागा)
उमेदवार मिळालेली मते

अरुण डोंगळे 1,980, अभिजित तायशेटे 1,972, अजित नरके 1,972, नाविद मुश्रीफ 1,959, शशिकांत पाटील-चुयेकर 1,923, विश्वासराव पाटील 1,912, किसन चौगले 1,889, रणजितसिंह पाटील 1,872, नंदकुमार ढेंगे 1,867, कर्णसिंह गायकवाड 1,848, बाबासाहेब चौगले 1,814, अंबरिशसिंह घाटगे 1,803, बाळासाहेब खाडे 1,795, चेतन नरके 1,762, संभाजी पाटील 1,721, प्रकाश पाटील 1,709.

 महिला राखीव प्रवर्ग 
(दोन जागा)

अंजना रेडेकर 1,877, शौमिका महाडिक 1,764

इतर मागास प्रवर्ग (एक जागा)
अमरसिंह पाटील 2,021

 विमुक्त/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग (एक जागा)
बयाजी शेळके 1,939

 अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (एक जागा)
सुजित मिणचेकर 1,965
 

गेली तीस वर्षे दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आमच्यावर विश्वास ठेवून गोकुळ दूध संघ आमच्या ताब्यात दिला. इतकी वर्षे सातत्याने आमच्या कारभारावर विश्वास ठेवणार्‍या या शेतकरी दूध उत्पादकांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी दिलेला कौल आम्हास मान्य आहे. दूध उत्पादकांनी आमच्यापेक्षा अधिक चांगल्या कारभाराची अपेक्षा करून त्यांना सत्ता दिली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा.               - आमदार पी. एन. पाटील

गोकुळचा हा विजय सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकर्‍यांचा आहे. आता यापुढे गोकुळ संघाकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. शेतकरी  आघाडीच्या सर्वच नेत्यांवर विश्वास ठेवून एकहाती सत्ता दिली आहे. त्याबद्दल मी दूध संस्था चालकांचे आभार मानतो. त्यामुळे आता गोकुळला देशातील एक नंबरचा प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न करू.
       - राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

मल्टिस्टेट विरोधातील तत्त्वाच्या लढाईचा हा विजय आहे. गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट न करता दूध उत्पादकांच्या मालकीचा राहावा हीच आमची भूमिका आहे. मतदारांनीही त्यावर विश्वास दाखविला. सत्तेच्या राजकारणातून दूध उत्पादकांवर जो अन्याय होत होता, तो बंद होईल. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला जाईल.- माजी आमदार चंद्रदीप नरके

सत्ताधारी आघाडी पराभूत झाली असली तरी चार उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक संपली असल्याने आता त्याबरोबरच ईर्षाही संपली पाहिजे. गोकुळला मोठे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
 - अरुण नरके  माजी अध्यक्ष