Wed, May 12, 2021 01:19
कोल्हापूरकरांना गोकुळ दूध संघ एवढा का महत्वाचा वाटतो?

Last Updated: May 04 2021 7:43PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

मागील सहा महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच वार घुमत आहे. आज निवडणुकीची मत मोजणी सुरू आहे. अजूनही गोकुळचे चित्र स्पष्ट झालेल नाही. राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलचे म्हणजेच विरोधी गटातील ९ उमेदवार आघाडीवर आहेत. तर राजर्षी शाहू पॅनेलमधील शौमिका महाडिक विजयी झाल्या आहेत. अटीतचीटी लढत सुरु आहे. 

वाचा :गोकुळ निवडणुक: तीसऱ्या फेरीअखेर विरोधी गटाचे १२ उमेदवार आघाडीवर तर सत्ताधारी गटाच्या ४ उमेदवारांची आघाडी

२ मे २०२१ ला गोकुळची निवडणूक झाली. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनूसार राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे १३ उमेदवार आघाडीवर आहेत. तर सत्ताधारी महाडिक गटातील ३ उमेदवार आघाडीवर आहेत. विजयी उमेदवारांमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ३ उमेदवारांचा समावेश आहे. तर राजर्षी शाहू आघाडी गटाचे १ उमेदवार विजयी झाले आहेत. तर विद्यमान अध्यक्ष पराभवाच्या छायेत आहेत. या निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळला फार महत्व आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील या गोकुळ दूध संघाच्या संचालक पदासाठी अटीतटीची लढत असते. संचालक पदासाठी अनेकजण इच्छुक असतात. दूध संघांची २,३८२ कोटींची उलाढाल आहे. तर कामगारांची संख्या २००० हजाराच्या पुढ आहे. मुंबई, पुण्यात कोठेही जा अगदी बाहेरच्या राज्यात जरी गेला तरी आमच्या कोल्हापूरच्या गोकुळच नाव दिसणारच. हा सहकारी दूध संघ आहे. दररोज १४ लाख लिटर दुधाचं संकलन असणारा राज्यात गोकुळ हा एकमेव दूध संघ आहे. भारतात दुधाचे जे ब्रॅन्ड आहेत. त्यात गोकुळचा अमुलनंतर नंबर लागतोय. त्यामुळंच कोल्हापूर जिल्ह्याच बरच अर्थचक्र गोकुळ दूध संघावर चालते.

वाचा :'सतेज पाटीलांनी गोकुळमध्ये आणला सामान्य कार्यकर्ता'

गोकुळ दूध संघाची स्थापना

गोकुळ दूध संघाची स्थापना एन टी सरनाईक यांनी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आनंदराव चुयेकर होते. सुरुवातीला त्यांनी करवीर तालुका तसेच आसपासच्या खेड्यापाड्यातून घागरीने दूध संकलन केलं. सुरुवातीला ६०० लीटर दुधाचं संकलन व्हायचं. पुढे संकलन वाढू लागले. आज कोल्हापूर जिल्ह्यात १२२० गावं आहेत. त्यामध्ये ४८०३ दूध सहकारी संस्था आहेत. येथून रोज दुधाची गुणवत्ता तपासून घेतली जाते. ते मुख्य डेअरीकडे आणले जाते. तेथून ९० टँकरद्वारे मुंबई, पुण्यासह, बाहेरच्या राज्यातही दूध पाठवले जाते. मुंबईत पाच लाखांच्या पुढे ग्राहकांना दररोज दूध पुरविले जातं. मुंबईत अमुल दूधाला गोकुळ दूध हा एकमेव मोठा स्पर्धक आहे.

याच गोकुळ दूध संघावर कोल्हापूर जिल्ह्याच राजकारण चालतं. एक संचालक म्हणजे आमदाराच्या वजनाचा असतो. सहज तो संचालक त्या मतदार संघातील आमदार निवडून आणू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा गोकुळशी संपर्क आहे. गोकुळमधूनच आर्थिक गणितं गावगाड्यापर्यंत आहेत. गावातील पतसंस्थांचं सगळं आर्थिक गणित हे गोकुळवर अवलंबून आहे. एखाद्या शेतकऱ्याला कर्ज घ्यायचं असेल तर या पतसंस्थेतून मिळतं. यासाठी गोकुळच्या संचालकाची शिफारस महत्वाची असते. त्यामुळे संचालकांचा ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क जास्त असतो.

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच राजकारण करायचं असेल तर गोकुळ दूध संघात सत्ता पाहीजे, अशी सगळ्यांची इच्छा असते. यामुळेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चर्चा राज्यभर असते.

वाचा : गोकुळ निवडणुक: विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे पराभवाच्या छायेत