Thu, Jul 09, 2020 23:32होमपेज › Kolhapur › दूध ‘गोकुळ’चे... पाणी थेट पाईपलाईनचे; निमित्त महापालिका, ‘गोकुळ’ निवडणुकीचे

दूध का दूध... पाणी का पाणी!

Last Updated: Mar 12 2020 12:24AM
कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

प्रसंग कोणताही असो जेव्हा दोन्ही बाजू समोरासमोर भांडताना टोकाला येतात, तेव्हा दोघेही एकमेकांना होऊन जाऊ दे एकदा काय ते दूध का दूध...पाणी का पाणी, असे म्हणतात. एकमेकांची पुरती उणीदुणी काढून झाल्यावर दूध का दूध... पाणी का पाणी करायचे कोणी? असा प्रश्‍न पडतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही असेच दूध का दूध... पाणी का पाणी सुरू आहे. निमित्त आहे कोल्हापूर महापालिका व ‘गोकुळ’च्या होणार्‍या निवडणुकीचे.

कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, ‘गोकुळ’, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा बाजार समिती या सगळ्या सत्तास्थानांवर महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके यांची सत्ता होती. मात्र, 2001 साली सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी उभारली. जोरदार लढा दिला. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच बाजार समितीवरील मनपा युतीची सत्ता त्यांनी संपुष्टात आणली, तरी त्यांचा विजयरथ महाडिकांच्या नेतृत्वाखालील मनपा युतीने ‘गोकुळ’मध्ये अडविला व ‘गोकुळ’वरील सत्ता अबाधित राखली.

तेव्हापासून ‘गोकुळ’ गडाला शिड्या लावण्याचे अनेक प्रयत्न विरोधकांनी केले ते ‘गोकुळ’च्या सत्ताधार्‍यांनी हाणून पाडले. आताही ‘गोकुळ’साठी जोरदार राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ‘गोकुळ’च्या सत्ताधार्‍यांना विरोधकांची ताकद काय आहे, ते मल्टिस्टेटच्या मुद्द्यावरून विरोधकांनी दाखवून दिली आहे. लोकसभा व विधानसभेला महाडिक यांना वैयक्‍तिकरीत्या याची किंमत चुकवावी लागली आहे. तर ‘गोकुळ’ गडाला हादरे देण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. मतदारयादीवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. ‘गोकुळ’ला नियमानुसार दूधपुरवठा न करणार्‍या 81 दूध संस्थांची मान्यता रद्द झाली. हा ‘गोकुळ’मधील सत्तेला बसलेला पहिला हादरा आहे. कारण, हा निर्णय ज्यांनी घेतला ते दुग्धविकासमंत्री सुनील केदार हे काँग्रेसचे आहेत. महाडिक यांचा पुतण्या, मुलगा व सून भाजपमध्ये आहेत. राज्यातील सत्ताबदलानंतर राजकारण बदलते आहे. 

त्याचबरोबर महाडिक यांचे कट्टर विरोधक असलेले सतेज पाटील हे गृह राज्यमंत्री झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ग्रामविकासमंत्री आहेत. या दोघांनाही मंत्रिपद मिळाल्याने साहजिकच त्यांची राजकीय ताकद वाढली आहे. त्याचा ते पुरेपूर वापर करणार, यात शंकाच नाही. यातूनच आरोप-प्रत्यारोपांचा हा सिलसिला सुरू झाला आहे. 

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्याचे नेतृत्व सतेज पाटील व हसन मुश्रीफ करत आहेत. महाडिक गटाकडून महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला जात आहे. थेट पाईपलाईन योजनेत ढपला पाडल्यापासून ते भाजपचा महापौर झाल्यावरच थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन उद्घाटन करणार असल्याचे सांगून माजी खासदार धनंजय महाडिक यांनी  हल्‍ला चढविला. तर त्याला उत्तर देताना सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना आम्हीच आणली, त्याचे भूमिपूजनही आम्हीच केले आता उद्घाटनही आम्हीच करणार असल्याचे सांगून  महापालिकेतील सत्ता आपण कायम राखू, असेच अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. 

दुधावरून  सुरू असलेले राजकारण आता निवडणुका पुढे गेल्यामुळे  थंड आहे. मात्र, तरीही अधूनमधून दुधाच्या राजकारणाला उकळी  फुटतेच. तशी ती महिला मेळाव्यात फुटली.  कोणाचेही  नाव न घेता सतेज पाटील यांनी दुधाला 2 ते 4 रुपये जादा दर देण्याचे सूतोवाच केले. तर याच मेळाव्यात बोेलताना हसन मुश्रीफ यानीही दुग्ध पदार्थांनाही  चांगली  बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून थंड झालेल्या  दुधाला उकळी देण्याचे काम केले.

दूध आणि पाणी या दोन मुद्द्यांभोवती राजकारण फिरते आहे. महापालिका व गोकुळच्या निवडणुकीतच मतदार दुध का दूध व पाणी का पाणी करून दाखविणार आहेत. तोवर  हे आरोप-प्रत्यारोप होतच राहणार आहेत.