Tue, Jul 14, 2020 05:45होमपेज › Kolhapur › वांगी बोळातील चहा अन् रंकाळ्यावर फेरफटका

वांगी बोळातील चहा अन् रंकाळ्यावर फेरफटका

Published On: Mar 19 2019 1:28AM | Last Updated: Mar 19 2019 12:21PM
कोल्हापूर : अनिल देशमुख

वांगी बोळातील चहा आणि रंकाळ्यावर फेरफटका नित्याचा असायचा, कोल्हापुरातील गल्ली-बोळातून, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी विद्यापीठ आदी परिसरातून मित्रांसमवेत फिरणारा, कोल्हापूरवर प्रचंड प्रेम आणि अंबाबाईवर अपार श्रध्दा असलेला, सोमवारी गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आणि कोल्हापुरातील डॉ. प्रमोद सांवत यांच्या मित्रपरिवाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

गोव्याचे नूतन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे तब्बल साडेपाच वर्षे कोल्हापुरात वास्तव्य होते, याच काळात त्यांचे नेतृत्व गुण बहरले, त्यातून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला. जुलै 1991 मध्ये कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन संस्थेच्या गंगा आर्युवेदिक महाविद्यालयात डॉ. सावंत यांनी ‘बीएएमएस’साठी प्रवेश घेतला होता. रंकाळ्याजवळील ‘आठवण’ नावाच्या इमारतीत ते तीन मित्रांसह राहत होते. मध्यवर्गीय कुटुंबात आलेल्या डॉ. सावंत यांनी आयुष्यातील पहिली निवडणूक लढवली ती कॉलेजच्या जीएस पदाची. या निवडणुकीत ते विजयी झाले आणि तेथूनच खर्‍या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाला प्रारंभ केला.

गावाकडून आणलेली यामाहा मोटारसायकल घ्यायची, वांगी बोळात चहा प्यायचा, कोल्हापुरातून गाडी पळवायची आणि शेवटी रंकाळ्यावर एक फेरफटका मारायचा, असा जणू त्यांचा दिनक्रम ठरलेलाच असायचा. कधी क्रिकेट मॅच तर कधी फुटबॉल मॅचसाठी कधी शिवाजी स्टेडियम तर कधी विद्यापीठाच्या मैदानावर रममाण व्हायचा. कॉलेज स्नेहसंमेलन असो, अथवा कोणताही कार्यक्रम असो, डॉ. प्रमोद यांच्या नेतृत्वगुणाचे दर्शन व्हायचे, प्रत्येकाला मदत करण्याची त्याची वृत्ती सर्वांना जवळ करणारी ठरली. तो नेहमी म्हणायचा मला गोव्याचा आमदार व्हायचा आहे. आम्ही म्हणायचो आधी डॉक्टर हो, बीएएमएस पूर्ण कर, आई-वडील वाट बघतायेत पण, त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते, तो डॉक्टर झाला, आमदारही झाला, कमी वयाचा सभापतीही झाला आणि आता तर थेट मुख्यमंत्री झाला, मित्रांसाठी यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो अशा भावना त्यांचे उचगाव (ता. करवीर) येथील मित्र डॉ. रणजित सांवत, श्रीरामपुर, अहमदनगर येथील डॉ. महेश क्षीरसागर यांनी व्यक्‍त केल्या.

शिक्षण संपवून डॉ. सावंत गोव्यात गेले, पण त्यांनी कोल्हापूरचा स्नेह कधीच सोडला नाही. दरवर्षी न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला डॉ. सावंत सहकुटुंब येतात. यानंतर मित्रांना आवर्जून भेटतात. कोल्हापुरातील मित्रांनी काढलेल्या सीसीआय या संस्थेचा ते सभासदही आहेत. मित्रांचा कोणातही कार्यक्रम असो, त्याला आवर्जून उपस्थिती लावतात, कोणत्याही कार्यक्रमाला प्रमोद येणार आहे, म्हटले की संपूर्ण मित्र जमा व्हायचे असे मित्रपरिवारांशी असलेले नाते त्यांनी आजही कायम ठेवल्याचे डॉ. रणजित सावंत यांनी सांगितले.

आई अंबाबाईचा आशीर्वाद कायम राहील

आमचे आणि कोल्हापूरचे नाते अतूट आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आम्हाला कुलदैवतासारखीच आहे. यामुळे आम्ही दरवर्षी तिच्या दर्शनाला येत असतो. तिचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहील, गोव्याची जनता सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी राहील, गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहील.त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरूनच पुढे जात ते गोव्याची सेवा करतील, अशा भावना नूतन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केल्या.