Sat, Feb 29, 2020 18:36होमपेज › Kolhapur › राजू शेट्टी कडाडले : तर 'त्यावेळीच' मुश्रीफांवर छापे का टाकले नाहीत? 

राजू शेट्टी कडाडले : तर 'त्यावेळीच' मुश्रीफांवर छापे का टाकले नाहीत? 

Published On: Jul 26 2019 6:10PM | Last Updated: Jul 26 2019 6:11PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर  : पुढारी ऑनलाईन 

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह सहा विविध ठिकाणी काल (ता.२५) छापे पडल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. जे भाजपमध्ये प्रवेश करत नाहीत त्यांच्यावर छापे टाकले जात आहेत. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

राजू शेट्टी म्हणाले, छापे टाकायचेच होते, तर आयकर विभागाने ज्यावेळी आमदार हसन मुश्रीफ मंत्री होते, त्यावेळी का छापे टाकले नाहीत? भाजपमध्ये येत नसेल अथवा उपद्रवी ठरत असेल तर छापे टाकले जात आहेत. अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि आयकर विभाग हे सरकारचे दोन ॲक्टीव्ह  कार्यकर्तेच आहेत. 

कृषिमूल्य आयोग नव्हे तो सेटलमेंट आयोग आहे, एफआरपी आहे तेवढीच ठेवत आयोगाने आपण केंद्र शासनाच्या हातातील बाहुले असल्याचे दाखवून दिल्याची टीका शेट्टी यांनी केली. यावेळी राजू शेट्टी यांनी ईव्हीएम हटावबाबत 9 ऑगस्टला मुंबईत लाँग मार्चचे आयोजन केले असून जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानासह सहा ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सकाळी एकाचवेळी छापे टाकले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज साखर कारखाना, कोल्हापूर येथील दोन्ही घरे, पुणे येथील फ्लॅट, कागल येथील जुने घर या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्याचे वृत समजताच जिल्ह्यात खळबळ उडाली.