Thu, Feb 20, 2020 16:36होमपेज › Kolhapur › भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी धनंजय महाडिक यांची नियुक्‍ती

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी धनंजय महाडिक यांची नियुक्‍ती

Published On: Sep 05 2019 6:02PM | Last Updated: Sep 06 2019 1:26AM

धनंजय महाडिककोल्हापूर : प्रतिनिधी

माजी खासदार धनंजय महाडिक यांची पक्ष प्रवेशानंतर चार दिवसांत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाडिक यांनी सोलापूर येथील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  भाजपमध्ये प्रवेश केला. महाडिक यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्‍त केला. 

माजी खासदार महाडिक यांनी नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून लढविली होती. महाडिक हे 2014 साली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ते अस्वस्थ होते. लोकसभा निकालापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे महाडिक यांनी भाजपप्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांना पक्षाने तत्काळ जबाबदारी दिली. महाडिक हे युवा शक्‍तीच्या माध्यमातून संघटनात्मक काम करत असल्याने त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. 

भाजपमध्ये अलीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रवेश सुरू आहेत. या इनकमिंगच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित नेतेमंडळींना संघटनात्मक जबाबदारी अद्याप दिली नसल्याचे दिसते. मात्र महाडिक यांना पक्षाने तत्काळ संघटनात्मक जबाबदारी दिल्याचे दिसून आले.

दरम्यान, निवडीसंदर्भात महाडिक म्हणाले, भाजपने माझ्यावर राज्यभर काम करण्याची मोठी जबाबदारी टाकली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला आहे. त्यामुळे मला मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवू. महाडिक गटाचे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कार्यकर्त्यांचे चांगले नेटवर्क आहे. याचा भाजपला राज्यभर उपयोग करून दिला जाईल.