Sun, Aug 09, 2020 11:57होमपेज › Kolhapur › सांगा..! जगायचं तरी कसं?

सांगा..! जगायचं तरी कसं?

Published On: Aug 14 2019 11:23PM | Last Updated: Aug 14 2019 11:23PM
कोल्हापूर : संतोष पाटील 

शहरातील पुराच्या पाण्यात लक्झरी बंगल्यासह झोपड्यांनाही तडाखा बसला. सुमारे 20 हजार घरांत पुराचे पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुराच्या तडाख्यात अनेकांनी पोटाला चिपटा काढून उभारलेल्या सुखी संसाराचे घरटे विखुरले. प्रापंचिक साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच; शिवाय पुराच्या पाण्याने स्वप्नांचाही चुराडा केला. ओसरलेला पूर घरात आणि मनातही खुणा मागे ठेवून गेला. दहा दिवसांत होत्याचे नव्हते झाल्याने, ‘सांगा जगायचं कसं?’ असा भला मोठा प्रश्‍न पूरग्रस्त कुटुंबांपुढे आहे. 

एक किंवा दोन मुले, नवरा, बायको असेल, तर वृद्ध आई-वडील अशी बहुतांश चौकोनी कुटुंबाची रचना शहरात आहे. नोकरी व कामधंद्यांत बर्‍यापैकी स्थिरावल्यानंतर काहींनी फ्लॅट, बंगला घेतला. काहींनी जुन्याचं नवं करीत, आहे त्या ठिकाणी आपला संसार खुलवला. ऐपतीनुसार टुमदार म्हणावं घर बांधलं. रुचेल त्याने फ्लॅट घेतला. दरवर्षी ठरवून फ्रिज, टीव्ही, गालिचा, फर्निचर अशा वस्तू घेत घर सजवले. त्यासाठी प्रसंगी ईएमआयचा आधार घेतला. जोडीला गृहकर्ज होतेच. मिळकत आणि वाढता खर्च याचा ताळमेळ घालत असताना येणारा ताण संध्याकाळी परत आल्यानंतर क्षणात विसरायला लावणारं ठिकाण म्हणजे घर.  सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई, कुंड्या अन् छोट्या बागेची डागडुजी, नियमित घराची सजावट,  टुंबासह डायनिंगमध्ये जेवण आणि हॉलमध्ये गप्पा हा अनेकांचा पायंडा असतो. मात्र सोमवारी (दि.5) पंचगंगेच्या महापुराने यात खंड पाडला. फुटा फुटाने वाढणारे पाणी स्वप्नातील घरट्यात शिरले. हातात मिळेल त्यावस्तू व अंगातील कपड्यानिशी दहा दिवस निर्वासितासारख जगण नशिबी आले.

 रौद्र रुप दाखवून पंचगंगा पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली. पुराचे पाणी ओसरल्यावर थरथरत्या पावलांनी व पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी घरात प्रवेश केला. पुरामुळे बाहेर पडल्यापासून आपलं घर कसे असेल हा एकच प्रश्न यांच्या मनात घोळत होता. पै-पै साठवून अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर घेतलेल्या आठवणीच्या वस्तूंचे काय झाले असेल? याची हुरहूर लागली होती. घरात प्रवेश करताच भिती खरी ठरली. डोळ्यादेखत सुखी संसार वाहुन गेला.  पुराचे पाणी ओसरले असले तरी त्याच्या खुणा भिंतीवर स्पष्ट दिसतात तर मनात कायमच्या घर करुन राहिल्यात.