Thu, Sep 24, 2020 17:02होमपेज › Kolhapur › कर्जमाफीची ७४ हजार शेतकर्‍यांची चौथी यादी जाहीर

कर्जमाफीची ७४ हजार शेतकर्‍यांची चौथी यादी जाहीर

Published On: Dec 09 2017 12:53AM | Last Updated: Dec 09 2017 12:53AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीअंतर्गत शुक्रवारी चौथी यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये जिल्ह्यातील 12 हजार 800 थकबाकीदारांचा समावेश असून, 71 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तपासणीअंती कर्जमाफीच्या लाभाची रक्‍कम अदा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बँकेत कर्जदारांच्या याद्यांची तपासणी सुरू झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिली. 

मागील शनिवारपासून कर्जमाफीच्या तिसर्‍या यादीची प्रतीक्षा शेतकर्‍यांना होती. ही यादी बुधवारी प्रसिद्ध झाली. यात 7 हजार 852 शेतकर्‍यांचा समावेश होता. जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांच्या खात्यांवर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्‍कम जमा झाली असतानाच आता चौथी यादी प्रसिद्ध झाली. पहिल्या यादीत जिल्हा बँकांच्या 1089 शेतकर्‍यांना 3 कोटी 79 लाख, तर बँक ऑफ इंडियाच्या 150 शेतकर्‍यांना 95 लाख 88 हजार रुपयांची कर्जमाफी झाली. दुसर्‍या यादीत 612 शेतकतर्‍यांना 3 कोटी 35 लाख 25 हजारांची रक्‍कम जाहीर झाली होती. तिसर्‍या यादीत 7 हजार 500 शेतकर्‍यांना 12 कोटी 50 लाख जाहीर झाले. तर चौथ्या यादीत 74 हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. 

कर्जमाफीचे निकष बदलले

राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष बदल्याने जिल्ह्यातील प्रामाणिक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. याचा जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. तांत्रिक कारणामुळे जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी वंचित राहिले होते.

कर्जमाफी योजनेत 30 जून 2016 पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 जूननंतरचे कर्जदार शेतकरी वंचित राहिले होते. जिल्हा बँकेने जुलै व ऑक्टोबरमध्ये पीककर्जाचे वितरण केले होते. ही कर्जफेडीची मुदत 30 जूननंतर असल्याने नियमित कर्ज भरणार्‍यांना थकीत ठरविले नव्हते. या विरोधात आ. हसन मुश्रीफ यांनी आवाज उठविला होता. याची दखल घेऊनच शासनाने निकष बदलले.