Wed, Aug 12, 2020 03:45होमपेज › Kolhapur › आधी निसर्गानं झोडपलं, आता महावितरणनं लुटलं?

आधी निसर्गानं झोडपलं, आता महावितरणनं लुटलं?

Last Updated: Dec 14 2019 10:39PM
हमीदवाडा : मधुकर भोसले 

जिल्ह्यात जेव्हा महापुराने थैमान घातले होते, नद्या पात्रांबाहेर वाहत होत्या, नदीकाठांच्या पिकांबरोबरच माळरानावरील पिकेही पाण्यात होती, अशा जुलै ते ऑक्टोबरदरम्यानदेखील शेतीसाठी विद्युत पंपांनी भरपूर पाणी उपसा केला आहे..! हे म्हणणे महावितरणने बोलून जरी दाखवले नसले, तरी वीज बिलांच्या माध्यमातून हेच म्हटले आहे. 

कारण, 27 जुलै ते 27 ऑक्टोबर या  बिलांच्या कालावधीत जिल्ह्यात प्रचंड पाऊस व महापूर व परतीचा पाऊस असतानादेखील या महिन्यातील भरमसाट आकारणीची बिले वितरणने शेतकर्‍यांना पाठवली आहेत. एक तर विद्युतपुरवठासुद्धा नोव्हेंबरच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात सुरू झाल्याने व तोपर्यंत एकही युनिट खर्ची पडलेले नसताना वितरणने  आकारलेल्या या बिलांमुळे पूरग्रस्तांच्या वेदना आणखी गहिर्‍या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांतून तीव— संताप व्यक्त होत आहे.

यंदा विक्रमी महापुराने बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीतून  सावरणेदेखील त्याला कठीण झाले आहे. अशा मानसिकतेत ही वीजबिले माथी मारली आहेत. खरे तर, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला धुवाँदार पाऊस व लगेच ऑगस्टमध्ये आलेला पूर सर्वज्ञात आहे. याबरोबरच महापूर उतरून गेल्यानंतर देखील पुन्हा बरसलेला पाऊस व अगदी नोव्हेंबर च्या पहिल्या  आठवड्यापर्यत पडलेला परतीचा पाऊस यामुळे झालेले नुकसान व रानातील ओल ही बाब  वीजवितरण ला देखील माहिती आहे. जूनला पाऊस सुरु झाल्यावर शेतकर्यांनी  विद्युत पंप काढून घरी आणले. काहींचे जाग्यावरच राहिले व ते तसेच  सर्वांच्याच विद्युत पेट्या पुरात बुडाल्या. अद्यापपावेतो याची दुरुस्ती  सुरु आहे. याबरोबरच वीजवितरनचे  ट्रान्सफॉर्मर, नियंत्रण पेट्या, खांब  यांचेही प्रचंड नुकसान झाले त्याची दुरुस्ती मोठ्या कष्टपूर्वक करून  नोव्हेंबर पासून वितरण मार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर  सुरु आहे. मीटर खराब झाल्याने सध्या थेट विद्युत प्रवाह जोडून शेतकर्‍यांची  अडचण दूर करण्याचे कौतुकास्पद काम देखील वितरण कंपनी  करीत आहे ते नाकारताच  येत नाही. मात्र ही मनाने आकारलेली बिले हा प्रकार मात्र कमालीचा  धक्कादायक आहे. 

ही बिले आकारताना मागील व चालू  रिडींग आकडा एकच आहे मात्र वापरलेल्या युनिट ची संख्या मात्र ज्या त्या  एचपी क्षमतेनुसार निश्चित करून त्यानुसार बिले आकारून ति शेतकर्‍यांना दिली  आहेत. खरे तर या महिन्याची बिले आकारण्याचा काडीमात्र संबंध नाही. जर  सिस्टीम म्हणून आकारणी करणे अपरिहार्य असले तर मग शून्य युनिट ठेऊन ति  करायला हवी होती. 

दोष तांत्रिक; पण त्रास शेतकर्‍यांना 

या प्रकाराबाबत वीज वितरणशी संपर्क साधला असता ही बाब तांत्रिक त्रुटीमुळे घडली असल्याचे सांगण्यात आले; पण असे जरी असले तरी याबाबत आता ही बिले दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांना येरझार्‍या घालाव्या लागणार्‍या आहेत व तरीही वेगाने ही दुरुस्ती होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महावितरणने एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊन वरिष्ठ पातळीवरून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.