Tue, Aug 04, 2020 13:42होमपेज › Kolhapur › कोरोना काळात कुटुंबातील संवाद वाढवा; महाराष्ट्राचे माऊलीपण जपा : डॉ. आनंद नाडकर्णी (video)

कोरोना काळात कुटुंबातील संवाद वाढवा; महाराष्ट्राचे माऊलीपण जपा : डॉ. आनंद नाडकर्णी

Last Updated: Jul 03 2020 10:15PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

लॉकडाऊनला सुरुवातीच्या काळात लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण आता अनलॉक होताना खरे तर अधिक मानसिक संतुलनाची गरज आहे. चित्र नेमके उलट आहे. आपण चिडचिडे होत आहोत. आर्थिक विवंचनाही आहेत. एकूणच सध्याचा काळ संकटाचा आहे... आणि आस्था ही समृद्धीपेक्षा संकटाच्या काळात अधिक उपयुक्‍त ठरते. महाराष्ट्रात या मूल्याला मोठी परंपरा आहे. दोन वारकरी एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांना ते माऊली म्हणतात. आस्थेची उत्कटता या माऊली संबोधनामध्ये आहे.

कुटुंब एकसंध ठेवतानाच समाजाशी भावनिक नाळ तुटता कामा नये म्हणून उभ्या महाराष्ट्राने वारकर्‍यांचे हे माऊलीपण जपले पाहिजे. तसे घडले तर कोरोना आणि त्यातून उद्भवलेल्या शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक संकटांवर सहज मात करता येईल, असे प्रतिपादन ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ’चे महासंचालक, विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

‘पुढारी वेबिनार’चे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागची भूमिका विषद करताना सांगितले, की कोरोनापेक्षाही कोरोनाची भीती मोठी झालेली दिसते आहे... आणि कोरोनाकाळात उद्भवलेल्या अन्य समस्यांमुळेही अनेकांची मानसिक स्थितीही दोलायमान आहे. मानसिक आरोग्यच जर बिघडले, तर मग शारीरिक आरोग्याला फारसा अर्थ राहात नाही... अस्तित्वाच्या द‍ृष्टीने मनाचे व्यवस्थापन हा संकट काळातील कळीचा मुद्दा ठरतो. तो समाजासमोर यावा हे आजच्या वेबिनारचे उद्दिष्ट...

डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘कुठलेही उद्दिष्ट साध्य करायचे तर मनाचे संतुलन हवेच. संकटाच्या काळात ते राखण्याची गरज असताना  केवळ आध्यात्मिक प्रगतीअभावी घडते उलटे. संकटाच्या काळात माणसे आत्मकेंद्रित बनतात. अध्यात्माची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते, पण अध्यात्माच्या फलितासाठी सुद‍ृढ मन ही पायाभूत गरज आहे. मन सुद‍ृढ नसेल तर आध्यात्मिक प्रगती शक्यच नाही आणि पुन्हा अध्यात्म हे भावनिक नियोजनासाठी उपयुक्‍त ठरणारे हवे. जगद‍्गुरू तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणजे जो आपुले...’ अशा स्वरूपाचे भावनिक नियोजनाला पूरक ठरणारे अध्यात्म हवे.   

‘तीर्थाला गेला आणि हातपाय धुऊन आला’, असे अध्यात्मातील कर्मकांडाचे स्वरूप भावनिक नियोजनाच्या द‍ृष्टीने उपयुक्‍त ठरणारे नाही.”

संकट समोर आले, की ‘प्रतिक्रिया’ आणि ‘प्रतिसाद’ या दोन पैकी एक मार्ग मन निवडते. पंधरा दिवसांचे लॉकडाऊन असेल तर पटकन पिशव्या घेऊन बाजाराला जाणे, ही प्रतिक्रिया आहे, तर घरात जे जे उपलब्ध आहे, त्यात आपण पंधरा दिवस कसे भागवू शकतो, याचा विचार करणे, हा प्रतिसाद आहे, असे स्पष्ट करून डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, हे मला कळल्यानंतर कोरोनाने मरण पावलेल्यांचा लहानसा आकडा मला हादरवून सोडतो.

कारण तोच मी मनात साठवून ठेवलेला आहे. मी भावनिक, आध्यात्मिक द‍ृष्ट्या परिपक्‍व नाही. मी परिपक्‍व व्हायला हवे. कोरोना आजारातून बरे होणार्‍यांचा आकडा जो लाखोंच्या घरात आहे, तो माझ्या डोळ्यांसमोर अशावेळी फिरायला हवा. मी मनाने मजबूत राहिलो तर सगळ्या संकटांवर मात करू शकतो आणि मनाने खचलो तर किरकोळ संकटही मला संपवू शकते!’ मेंदूच्या, मनाच्या परिपक्‍वतेसाठीचा कानमंत्रही डॉ. नाडकर्णी यांनी दिला.

मनात भीती असेल तर लगेच आशा जागृत करा. विचारांबद्दल, भावनांबद्दल जागरूक राहा. मनातले प्रवाह ओळखा. भीतीमागे नेमके काय आहे? शक्यता आहे, की खात्री आहे, त्याची पडताळणी करा. समजा तुम्हाला शिंक आली आणि यामुळे कोरोनाचे भय उत्पन्न झाले, तर स्वत:ला सांगा की केवळ शक्यता आहे. तपासले, अहवाल पॉझिटिव्ह आला तर लक्षणे वाढण्यापूर्वी आपण तपासून घेतले आणि कोरोना सौम्य स्वरूपाचा आहे. आपण लगेच बरे होऊ शकतो म्हणून समाधान माना.

परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे, की नियंत्रणाबाहेर आहे, हे आधी ठरवा. काय घडू शकते आणि मी काय करू शकतो, याचा विचार करा. परिस्थितीचे क्षुल्लकीकरण आणि महाभयंकरीकरण दोन्ही घातक आहे आणि माणूस नेमके या दोनपैकी एक करून मोकळा होतो. कोरोनाच्या काळात हेच नेमके घडलेले आहे. काही लोक कोरोनाला एकदम क्षुल्लक समजतात, तर काही त्याचा टोकाचा बाऊ करतात. नेमके हे घडायला नको आहे. कोरोनावर अशा दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया नकोत, आणखी पुढचे दीड वर्ष तरी संतुलित प्रतिसाद समाजाकडून अपेक्षित आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. संतोष आंधळे यांनी वेबिनारचे निवेदन व सूत्रसंचालन केले.

सर्व पॅथीज्च्या डॉक्टरांना मानसोपचाराचे मूलभूत शिक्षण आवश्यक

134 कोटींच्या देशात पदवी घेऊन बाहेर पडणार असलेल्यांना धरून फक्‍त 9 हजार मानसोपचार तज्ज्ञ आहेत. महाराष्ट्रात जिल्ह्याची ठिकाणे आणि ती वगळता काही मोजकी शहरे सोडली तर मानसोपचाराची सुविधा उपलब्ध नाही. प्राप्‍त परिस्थितीत देशाला मनोबलाची आवश्यकता अधिक आहे. ती पाहता देशभरातल्या तमाम डॉक्टरांना (मग ते अ‍ॅलोपॅथिक असोत, होमिओपॅथिक असोत नाहीतर आयुर्वेदाचार्य) मानसोपचाराचे मूलभूत प्रशिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून देशाची गरज सत्वर पूर्ण व्हावी. कारण ‘कॉमन मेंटल डिसऑर्डर’ची समस्या तीव्र होत पुढे आत्महत्येचे स्वरूप धारण करते. पुढचे दीड वर्ष तरी हा कठीण काळ राहील हे लक्षात घेता या द‍ृष्टीने पावले उचलली पाहिजेत. सर्वच डॉक्टरांसाठी देशातील सर्व प्रमुख भाषांतून द‍ृकश्राव्य माध्यमात 20 तासांचा अभ्यासक्रम तयार करायला हवा. ठराविक व नियमित उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवर उपाय म्हणून नामवंत कलावंतांना सोबत घेऊन अर्ध्या-अर्ध्या तासाचे समुपदेशक व्हिडीओ तयार करायला हवे आणि ते देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचतील असा कार्यक्रम अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी मिळून आखला पाहिजे, असा उपाय डॉ. नाडकर्णी यांनी सुचविला.