Wed, Jul 08, 2020 04:24होमपेज › Kolhapur › प्रा. संजय मंडलिक यांच्या मंत्रिपदाची चर्चा

प्रा. संजय मंडलिक यांच्या मंत्रिपदाची चर्चा

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 26 2019 1:44AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा दिवसभर वृत्त वाहिन्यांवर सुरू होती. कोल्हापूरला यापूर्वी कोणत्याही खासदारांना केंद्रीय मंत्रिपद मिळालेेले नाही. त्यामुळे शनिवारी दिल्‍लीत नूतन खासदारांच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागून होते.

 प्रा. मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.  शुक्रवारी रात्री मंडलिक दिल्‍लीला रवाना झाले. शनिवारी दिल्‍ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना खासदारांची स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केली. शिवसेनेचे यापूर्वीचे केंद्रातील मंत्री अनंत गीते यांचा पराभव झाला. त्यामुळे ठाकरे मंत्रिपदासाठी कोणाचे नाव सुचवणार, याबाबत उत्सुकता लागून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला सहा आमदार दिले. तरीही राज्यातील मंत्रिपद कोल्हापूरच्या एकाही आमदाराला मिळाले नाही. कोल्हापूरने मला खासदार द्यावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातून शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आले. त्यामुळे कोल्हापूरला मंत्रिपद मिळावे, अशा भावना काही शिवसैनिकांनी व्यक्‍त केल्या होत्या. 

प्रा. मंडलिक यांना दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा राजकीय वारसा लाभला आहे. तसेच त्यांनी सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्‍लेखनीय काम केले आहे.  त्यामुळे प्रा. मंडलिक यांच्या रूपाने कोल्हापूरला मंत्रिपद मिळणार का, याची चर्चा कोल्हापुरात सुरू होती.