होमपेज › Kolhapur › राजकीय आखाड्यात दोन हात करू

राजकीय आखाड्यात दोन हात करू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाडिक-पाटील यांच्यात वाद आहे. या वादासाठी निवडणुकीचा आखाडा आहे. या आखाड्यात काय व्हायचं आहे ते होऊन जाऊ दे. त्यात दोन हात करण्याची आमची तयारी आहे, असे खुले आव्हान खा. धनंजय महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांना दिले. मात्र, त्याचवेळी महाडिक-पाटील वादासाठी ‘गोकुळ’ला वेठीस धरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ‘गोकुळ’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेले दोन महिने ‘गोकुळ’ दूध संघावर टीकेची झोड उठवली जात आहे. निवेदन, मोर्चे काढून संघाला बदनाम केले जात आहे. संघाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असताना चेअरमन, संचालक, कर्मचारी व संघाच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक टीका केली जात आहे. मोर्चामध्ये तर उंट, गाढव, बैल असे हिणवून विरोधक कसली संस्कृती दाखवत आहेत, असा सवाल खा. महाडिक यांनी केला.

या सर्व वादाला महाडिक-पाटील वादाची जोड आहे का, या प्रश्‍नास त्यांनी होकारात्मक उत्तर दिले. महाडिक, पाटील यांच्यात वाद आहे. हा वाद उघड आहे. पेट्रोलपंपावर रेड टाकून, कार्यकर्त्यांना मारहाण करून, कार्यकर्त्यांना अटक करून कोणी दहशत करत असेल, तर ते खपवून घेणार नाही. संघावर विरोधक टीका करत आहेत. मात्र, संघावर टीका करणारे आले किती आणि गेले किती, याचा काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. दूध उत्पादक शेतकर्‍यांचा ठेका घेणार्‍या आ. पाटील यांनी उसाच्या दरावर बोलावे.

त्यांना शेतकर्‍यांचा कळवळा असेल तर इतर साखर कारखान्यांप्रमाणे उसाचा दर द्यावा. राजाराम, भोगावती, बिद्री कारखान्यापेक्षा 300 रुपये टनाला कमीने दर देत आहेत. अगोदर त्या दराचा विचार करावा, असा चिमटाही खा. महाडिक यांनी काढला. आ. पाटील यांनी काढलेल्या मोर्चात दूध उत्पादक कमी आणि मोठ्या प्रमाणात मौनी विद्यापीठातील कर्मचारी, बावड्यातील जीन्स-टी शर्ट घातलेले युवक उपस्थित असल्याचा आरोप खा. महाडिक यांनी केला.

जशास तसे उत्तर देऊ

‘गोकुळ’ दूध संघाची, पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी व संघाच्या नेत्यांची गेले दोन महिने बदनामी सुरू आहे. तरीही संघाच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र उत्पादक, कर्मचारी ऐकण्यास तयार नसल्यानेच निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यातूनही जर टीकाटिपणी थांबली नाही, तर मात्र त्यांना ‘जशास तसे ’उत्तर देण्याचा इशारा, खा. महाडिक यांनी दिला.