Mon, Jan 25, 2021 15:05होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Last Updated: May 29 2020 4:50PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचा साक्षात संचार होऊन ते स्वतः भक्तांशी बोलतात असा बहाणा करून कोल्हापुरसह परिसरातील भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घालून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. मुख्य संशयितांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. प्रवीण विजय फडणीस (वय ४४, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे (वय ६५, रा. सासणे बिल्डिंग, चौथा बस स्टॉप फुलेवाडी), सविता अनिल अष्टेकर (वय ३५, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

संयुक्त पोलिस पथकाने मंगळवार पेठेतील सोमेश्वर चौका लगत असलेल्या ओम श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठावर गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. मठातून कागदपत्रे लॅपटॉप अन्य वस्तू तसेच एक तलवारही हस्तगत करण्यात आली आहे. तक्रारदार संदीप प्रकाश नंदगावकर राहणार देवकर पाणंद यांना संशयितांनी आपण बोलतो ते देव बोलतो आपल्यात देवाचा संचार आहे. देवाच्या तोंडातून आलेल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता न केल्यास आपले वाटोळे होईल संसार उध्वस्त अशी भीती घालून तिघांनी वेळोवेळी ३५ लाख रुपये उकळले आहेत. असेही नांदगावकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. स्वामी समर्थांचा संचार होत असल्याचे सांगणाऱ्या प्रवीण फडणीस आणि साईबाबांचा संचार होत असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या श्रीधर सहस्त्रबुद्धे या दोघांना येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तर सविता अष्टेकर हिला उद्या सकाळी न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील यांनी सांगितले की, संशयिताने गेल्या सात-आठ वर्षात अनेक कुटुंबियांचे फसवणूक केली आहे. स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचा साक्षात संचार होत असल्याचे भासवून वीसहून अधिक भाविकांना पाच लाखांपासून २५ लाखापर्यंत फसवले आहे. काहीजणांना कर्ज काढून पैसे देण्यास संशयितांनी भाग पाडले आहे. फसगत झालेल्या २० पेक्षा अधिक भाविकांनी राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला आहे. असेही पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

त्यामध्ये ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दीक्षित, रेणुका अरविंद शिंगरे, श्रीमती विद्या गिरीश दीक्षित, केदार श्री, दीक्षित रूपा, किशोर बाजी, श्रीमती दीपा नारायण बाजी, शहाजी हिंदुराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मीनाक्षी मलिंद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी आदींच्या तक्रारींचा समावेश आहे. कोल्हापुरात मध्यवर्ती सिद्धाळा गार्डन परिसरात विशेषत: पुरोगामी विचारसरणीचा वारसा असलेल्या शहरात भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असावा अशी चर्चा आहे. फसगत झालेल्या नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची भेट घेऊन संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत राजारामपुरीचे प्रमोद जाधव, योगेश पाटील यांनी ही कारवाई केली.

वाचा : घरावर गुढी, भगवे ध्वज उभारून साजरा करा शिवराज्याभिषेक : वसंतराव मुळीक

संशयितांनी केली पती-पत्नीच्या नात्याची ताटातूट

विविध कारणांनी नैराश्याच्या गर्तेत असलेल्या दाम्पत्याने मठात जाऊन संशयितांची भेट घेतली. कौटुंबिक कलह नैराश्य आर्थिक परिस्थितीची माहिती देऊन त्यांच्याकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र, संशयितांनी आपण पती-पत्नी एकत्र राहतात हे फार मोठे अरिष्ट आहे. दोघांचे ग्रह वेगवेगळे असल्याने कदाचित जीविताला धोका येऊ शकतो. त्यामुळे आपण दोघे अलिप्त रहा म्हणजे सर्व काही साध्य होईल. असा ते सल्ला देत होतो त्यातून अनेक द पत्त्याच्या नात्यात ताटातूट झाले आहे, असेही तपास अधिकारी प्रमोद जाधव यांनी सांगितले. फसगत झालेल्या लोकांकडून सहा वर्षे त्यांनी लाखो रुपये घेतले आहेत. त्यापैकी काहीजण खासगी सावकारीतून तर काही जणांनी बँका, अंगावरचे दागिने गहाण ठेवून संशयितांना पैसे पुरवले आहेत.

वाचा : कोल्हापुरातील कोरोना मीटर सुरुच; ३० जणांची भर