Sat, Feb 29, 2020 11:10होमपेज › Kolhapur › ब्रिटिशकालीन पुलावरूनच धोकादायक वाहतूक

ब्रिटिशकालीन पुलावरूनच धोकादायक वाहतूक

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:01AMकोल्हापूर : सतीश सरीकर  

श्री अंबाबाई मंदिरामुळे कोल्हापूर धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. रोज हजारो वाहनांतून भाविक व पर्यटक भेट देत आहेत. मात्र, त्या तुलनेत कोल्हापुरातील वाहतूक असुरक्षित बनली आहे. शहरात ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरूनच धोकादायक वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी (26 जानेवारी) रात्री पावणेबाराच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बस शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत कोसळून तेरा निष्पापांचा बळी गेल्यानंतर कोल्हापुरातील पुलांच्या मजबुतीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

गेली शंभर ते दीडशे वर्षे सातत्याने ऊन, वारा व पावसाचा मारा झेलत अद्यापही तग धरून असलेले कोल्हापूर शहरातील आठ पूल आता धोकादायक बनले आहेत. नव्या पुलांची निर्मिती होईपर्यंत ब्रिटिशकालीन या पुलांची डागडुजी करणे आवश्यक आहे. पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी नियुक्‍त करण्यात स्ट्रकवेल डिझाईनिंग अ‍ॅण्ड कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीने पुलांच्या मजबुतीकरणासाठी सुमारे दोन कोटी खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल दिला. नुकतेच 23 जानेवारीला महापालिकेच्या वतीने पुणे विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

संभाजी पूल...
शहराच्या पूर्व-पश्‍चिम भागाला जोडण्यासाठी पहिल्यांदा 1870 मध्ये संभाजी पुलाची उभारणी करण्यात आली. सुमारे दीडशे वर्षे होत आलेल्या या पुलाच्या कमानीचा प्रमुख आधारस्तंभ असलेला की स्टोन निखळला आहे. काळाच्या ओघात दगडी बांधकामातील दर्जा निघून गेल्या आहेत. झाडेझुडपे वाढून बांधकामात खोलवर गेल्याने बांधकाम खिळखिळे झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामावर केमिकलयुक्‍त इपॉक्सी ग्राऊटिंग करून दर्जा भरणे आवश्यक आहे. 
 

फुलेवाडी पूल...
फुलेवाडी पूल हा 1955 मध्ये बांधण्यात आला आहे. आता या पुलाच्या दर्जा निखळल्या आहेत. त्यामुळे दगडी बांधकामाचा भाग उघडा पडला आहे. तसेच स्लॅबला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी बांधकामातील सळ्या दिसत आहेत. परिणामी त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत या बांधकामाला केमिकलयुक्‍त ग्राऊटिंग आवश्यक आहे. तसेच उघड्यावर असलेल्या सळ्यांना गंजरोधक ट्रिटमेंट करणे आवश्यक आहे. 
 

रविवार पूल...
1879 मध्ये उमा टॉकीज ते पार्वती टॉकीजच्या मध्ये असलेल्या रविवार पुलाची बांधणी झाली. 127 फूट लांबी व 21 फूट उंची आहे. या पुलाच्या बांधकामातील दर्जा निघाले आहेत. त्यामुळे सळ्या उघड्यावर पडल्याचे दिसत आहे. सपोर्टिंग पट्ट्याही खराब झाल्या आहेत. बांधकामाबरोबरच कॉलम, भिंतीही खिळखिळ्या झाल्या आहेत. परिणामी बांधकामाच्या दर्जा केमिकलने भरून बांधकाम मजबूत करणे आवश्यक आहे. स्टीलवर गंजरोधक केमिकल लावावे. 
 

 विल्सन पूल...
1927 मध्ये 76 फूट लांबी व 15 फूट उंचीचा लक्ष्मीपुरीत विल्सन पूल उभारण्यात आला. सद्यस्थितीत पुलावरून अवजड वाहनासह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. पुलाचे बांधकाम निखलले आहे. दर्जा भरणे आवश्यक असून त्यासाठी ग्राऊटिंगचा वापर करण्यात यावा. स्लॅबचे पापुद्रे निघाले आहेत. सळ्या दिसत आहेत. 
 

 शाहू पूल... 
1875 मध्ये दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर या रस्त्यावर शाहू पूल बांधण्यात आला. 87 फूट लांबी व 21 फूट उंची असलेल्या या पुलाला शहरवासीय जुना पूल म्हणून ओळखतात. काळाच्या ओघात पूल कमकुवत बनला आहे. पुलाचे बांधकाम निखळले असून त्यासाठी रोखण्यासाठी ग्राऊटिंग आवश्यक आहे. गंजरोधक केमिकल वापरणे आवश्यक आहे. 

 जयंती पूल... 
दसरा चौकातून कसबा बावड्याला ये-जा सुलभ होण्यासाठी 1876 मध्ये जयंती नदीवर (सध्याचा जयंती नाला) 91 फूट लांबी व 31 फूट उंचीचा पूल बांधण्यात आला. कोल्हापूर शहर ते कसबा बावडा या मार्गाला जोडणार्‍या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यासाठी पर्याय म्हणून नवीन पूल  बांधला असला तरी जुन्या पुलावरून अद्यापही अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे पूल कमकुवत बनला आहे. 

हुतात्मा पूल (उत्तर बाजू)...
स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये हुतात्मा पार्क येथे दक्षिण बाजूला 44 फूट लांब व 13 उंच असा दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला 103 फूट लांब व 24 फूट उंचीचा पूल बांधण्यात आला. पुलाच्या कमानीचे की स्टोन कमकुवत झाले आहेत. दर्जा निखळल्या आहेत. त्यामुळे ग्राऊटिंग, गंजरोधक केमिकल प्रक्रिया आवश्यक आहे. 

हुतात्मा पूल (दक्षिण बाजू)...
स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये हुतात्मा पार्क येथे दक्षिण बाजूला 44 फूट लांब व 13 उंच असा दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला 103 फूट लांब व 24 फूट उंचीचा पूल बांधण्यात आला. पुलाचे बांधकाम निखळले असून त्यासाठी रोखण्यासाठी ग्राऊटिंग आवश्यक आहे.