कोल्हापूर : आशिष शिंदे
सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. आपला पक्ष इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे मतदारांना पटवून देण्यासाठी पक्षा-पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत मोबाईल गेम्स तरी कशा मागे राहतील? सध्या मोबाईल गेम्सच्या विश्वातही नमो आणि रागा यांच्यात स्पर्धा लागल्या आहेत.
नमो अर्थात पंतप्रधान मोदी आणि रागा म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी. देशभरातील तरुणाईला सध्या मोदी रन, राहुल रन, पॉलिटिकल क्रिकेट यासोबतच लोकसभा क्विझसारख्या गेम्सनी वेड लावले आहे. देशभरात लाखो लोकांनी या गेम्स डाऊनलोड केल्या आहेत. मग यात कोल्हापूरकर कसे मागे राहतील? कोल्हापुरातील तरुणाईलादेखील या गेम्सनी भुरळ घातली आहे.
रागानी नमोच्या बॉलला सिक्स मारली... मनमोहननी एक रण घेतली बघ... नमोनी रागाला आऊट काढले बघ... अशा चर्चा सध्या कोल्हापुरातील गल्लोगल्लीत ऐकायला मिळत आहेत. कोपर्या- कोपर्यावर या गेम्स खेळताना अनेक तरुण पहायला मिळत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार विविध कल्पनांचा वापर करत आहेत. या निवडणुकीत 18 ते 19 वयोगटातील नवमतदारंची संख्या तब्बल 1.5 कोटींच्या घरात आहे. तर जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 6 लाख 22 हजार मतदार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसोबत उमेदवारांचे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या गेम्स याचाच एक भाग म्हणावे लागेल. या गेम्स डाऊनलोड करणार्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
अशा आहेत गेम्स...
मोदी व्हर्सेस राहुल रन
यंदाची लोकसभा निवडणूक ही रागा विरुद्ध नमो अशी आहे. हाच मुद्दा ध्यानात ठेवून अनेक मोबाईल गेमिंग कंपन्यांनी मोदी व्हर्सेस राहुल अशा प्रकारच्या गेम्स तयार करायला सुरुवात केली आहे. सध्या मोदी व्हर्सेस राहुल रन ही गेम चांगलीच चर्चेत आहे. या गेममध्ये मोदी किंवा राहुल या दोघांपैकी एक पर्याय निवडावा लागतो. मोदी पर्याय निवडल्यानंतर गेम जिंकण्यासाठी हाताच्या पंज्यापासून स्वत:ला वाचवत कमळाची फुले गोळा करावी लागतात. तर राहुल पर्याय निवडल्यानंतर कमळापासून स्वत:ला वाचवत हाताचे पंजे गोळा करावे लागतात. कोल्हापुरातील गल्ली-बोळात या गेम्स खेळताना अनेक जण आपल्याला पहायला मिळत आहेत.
पॉलिटिकल क्रिकेट
रागानी नमोच्या बॉलला सिक्स मारली... मनमोहननी एक रन घेतली बघ... नमोनी रागाला आऊट काढले बघ... अशा चर्चा सध्या आपल्याला गल्लोगल्लीत ऐकायला मिळत आहेत. याला घाबरून जाऊ नका ते लोक पॉलिटकल क्रिकेट खेळत आहेत. सध्या क्रिकेट बॅटल पॉलिटिक्स ही गेम कोल्हापुरातील तरुणाईत चांगलीच चर्चेत आहे. या गेममध्ये टीम मित्रो, परिवार पार्टी, मफलर पार्टी, स्ट्रीट पॉवर पार्टी असे चार संघ आहेत. यापैकी कोणताही एक संघ निवडून ही गेम खेळता येते. यामुळे ही गेम सध्या चांगलीच चर्चेत आहेत.
लुडोवरही निवडणुकांचा फीव्हर
लुडो गेमलाही लोकसभा निवडणुकांचा रंग चढला आहे. या गेममध्येही आपल्या आवडीचा नेता निवडून लुडो खेळताना तरुणाई आपल्याला दिसेल.
लोकसभा क्विझ
शहरातील कॉलेज कॅम्पस्मध्ये सध्या एकच चर्चा आहे, ती लोकसभा क्विझची. लोकसभा क्विझसारखी अनेक अॅप सध्या चर्चेत आहेत. या अॅपवर मतदार संघासंबंधित, उमेदवारासंबंधित तसेच उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडावा लागतो. यामुळे सामान्य ज्ञानातही भर पडते आणि टाईमपासही होतो, असे तरुणाईचे म्हणणे आहे.