Sat, Feb 29, 2020 11:17होमपेज › Kolhapur › सीपीआरमधील ट्रॉमा केअरच ‘ट्रॉमा’मध्ये? 

सीपीआरमधील ट्रॉमा केअरच ‘ट्रॉमा’मध्ये? 

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 10:19PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत सुसज्ज इमारत तयार आहे.त्यामध्ये आवश्यक त्या सर्व साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पण, शाळेत शिक्षकच नाहीत, अशी अवस्था सध्या कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरची झाली आहे. 

अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुमारे आठ कोटी  खर्चाचा एक प्रकल्प रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. तथापि, शासनाने  आवश्यक स्थायी व अस्थायी पदांची निर्मितीच केली नाही. यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय  वजन खर्ची टाकले तर हा प्रकल्प मार्गी लागू शकतो.

सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित होण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाबरोबर परस्पर सहयोगाचा करार केला होता.  केंद्राने  भूमिका बजावली. पण, राज्य सरकार कुचराई करत आहे. ही बाब राज्याच्या लोकलेखा समितीसमोरही आली होती. या समितीने ट्रॉमा केअर सेंटरसाठी पदांची निर्मिती का केली नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला होता; परंतु अन्य विभागातील कर्मचारी हलविल्याने संबंधित विभागातील सेवांवर ताण येतात आणि संबंधित विभागात कर्मचारी पाठविले, तर ट्रॉमा केअर सेंटर बंद पडते, अशा कात्रीत महाविद्यालयीन प्रशासन अडकले आहे. 

देशामध्ये महामार्गांवर होणार्‍या अपघातांच्या संख्येतील लक्षणीय वाढ लक्षात घेऊन केंद्र शासनाने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्‍न रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास 2012 साली मंजुरी दिली होती. यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्या दरम्यान परस्पर सहकार्याचा करारही करण्यात आला. यानुसार ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम व उपकरणे यांच्या उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी केंद्राने द्यावयाचा आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची पदे निर्माण करून राज्य शासनाने त्याचा आर्थिक भार उचलायचा, असा हा करार होता. या कराराप्रमाणे केंद्राचे पैसे महाविद्यालयाच्या खात्यात 2013 मध्ये जमाही झाले. पण,  तीन वर्षे ही रक्‍कम खात्यावर व्याज मिळवित पडून होती. 

ही बाब दैनिक ‘पुढारी’ने प्रथम प्रकाशात आणली. यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पावले उचलत ट्रॉमा केअर सेंटर उभे केले. 9 व्हेंटिलेटर्ससह मोठा अतिदक्षता विभाग, दोन ऑपरेशन थिएटर अशा  सुविधांनी हा विभाग सज्ज झाला. पण, या विभागात काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांची 39 स्थायी पदे व टेक्निशियन्सची 9 कंत्राटी पदे अशा एकत्रित 48 पदांना मंजुरी मिळाली नाही. यामुळे गोरगरीब रुग्णांच्या उपचारात खंड पडताना रुग्णालयाला महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत या विभागातून मिळणार्‍या अपेक्षित कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्‍नालाही मुकावे लागले आहे. साहजिकच, कोल्हापूरचे जागरूक राजकारणी हे प्रकरण किती गांभीर्याने घेतात, यावर गोरगरिबांची आरोग्य सेवा अवलंबून आहे.