Tue, Jul 07, 2020 12:33होमपेज › Kolhapur › ‘सीपीआर’मध्ये मोफत केमोथेरपी कधी?

‘सीपीआर’मध्ये मोफत केमोथेरपी कधी?

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 11:37PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्रात कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा गंभीर आजार बनत असतानाही शासनाने नुकत्याच केमोथेरपी उपचारांच्या सुविधांसाठी जाहीर केलेल्या जिल्हा रुग्णालयांच्या यादीत सीपीआर रुग्णालयाचा समावेश नाही. यामुळे कोल्हापुरातील गोरगरीब कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या योजनेत सीपीआरचा समावेश केला पाहिजे. अन्यथा उपचाराशिवाय मृत्यू अशी वेळ कोल्हापुरातील गोरगरीब रुग्णांवर येऊ शकते.

कर्करोगावरील उपचारामध्ये केमोथेरपी ही उपचार पद्धती अतिशय महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. तथापि, हे उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता पकडण्याशिवाय आजपर्यंत पर्याय नव्हता. तेथील महागड्या उपचार पद्धतीमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत असल्याने राज्य शासनाने जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी उपचार पद्धती मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये येत्या जूनपासून पहिल्या टप्प्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णसंख्येची गंभीर पातळी असलेल्या कोल्हापूरला वगळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून कोल्हापूरसाठी ही सुविधा तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधून सुरू झाली आहे.

खा. राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांना खास पत्र लिहून कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटल व उदगाव येथील क्षयरोग रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी एका खास शिबिराचे आयोजन करून उपचाराच्या सुविधांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जशी शिरोळची अवस्था आहे, तसेच हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या कोल्हापूर जिल्ह्यातील, तर वाळवा, शिराळा या सांगली जिल्ह्यातही रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय, कोल्हापुरात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्याही काही कमी नाही. या पार्श्‍वभूमीवर मोफत केमोथेरपीसाठी सीपीआरमध्ये सोय उपलब्ध होण्याची आवश्यकता होती. खरेतर कोल्हापूरच्या एकूण रुग्णसंख्येचा आवाका लक्षात घेऊन नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये कोल्हापूरचा यापूर्वीच समावेश झाला होता आणि कॅन्सर वॉरिअर या उपक्रमासाठीही कोल्हापूरची निवड झाली होती. एवढी पार्श्‍वभूमी असतानाही मोफत केमोथेरपीतून कोल्हापूर जिल्हा कसा वगळला गेला? हेच मोठे कोडे आहे. 

जिल्ह्यात कर्करोगाचे आव्हान 

भारतात आरोग्यक्षेत्रापुढे कर्करोगाचे आव्हान मोठे आहे. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार प्रतिवर्षी 11 लाख नवे कर्करोगग्रस्त रुग्ण आढळून येतात. सध्या सुमारे 28 लाख रुग्ण या रोगांशी सामना करताहेत. तर 5 लाख रुग्णांना कर्करोग आपले जीवन संपविण्यास कारणीभूत ठरतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत ही संख्या अतिशय झपाट्याने वाढली आहे. केवळ शिरोळ तालुक्यातच हजारो रुग्ण असल्याची माहिती पुढे येते आहे. घरोघरी रुग्ण अशी काही ठिकाणी अवस्था आहे. 
 

Tags : cpr, chemotherapy, kolhapur news