Wed, Sep 23, 2020 22:41होमपेज › Kolhapur › कोल्हापूर दक्षिण कोणाची जहागीर नाही

कोल्हापूर दक्षिण कोणाची जहागीर नाही

Published On: May 30 2019 1:34AM | Last Updated: May 30 2019 12:59AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर दक्षिणचे आ. अमल महाडिक यांनी शहराच्या विकासासाठी विविध प्रभागांत निधी दिला आहे; परंतु त्यातही राजकारण आणले जात आहे. आपल्या प्रभागात निधी खर्च करू नये, अशी पत्रे देऊन महाडिक यांच्या निधीतील विकासकामांत काँग्रेसचे नगरसेवक अडथळे निर्माण करत आहेत. एनओसी (ना हरकत दाखला) देऊ नये, यासाठी अधिकार्‍यांवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप नगरसेवक किरण नकाते यांच्यासह भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी महासभेत केला. कोल्हापूर दक्षिण कोणाची जहागीर नाही, असे म्हणत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवक व प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला. त्यानंतर कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. 

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविका व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक आमने-सामने आले. प्रचंड आरडाओरडा सुरू होता. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते. आयुक्‍तांनी अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांना चौकशी करून अहवाल देऊ, असे सभागृहात सांगितले. 

नकाते म्हणाले, राजलक्ष्मीनगर प्रभाग (क्र. 70) मधील पॅसेज काँक्रीटसाठी आ. महाडिक यांनी सहा महिन्यांपूर्वी आठ लाखांचा निधी दिला आहे; परंतु महापालिका प्रशासन अद्याप त्यासाठी एनओसी देत नाही. दक्षिण विधानसभा मतदारसंघात येणार्‍या शहरातील सर्व प्रभागांत ही स्थिती आहे. यामागे काय गौडबंगाल आहे? कोल्हापूर दक्षिण कोणाची जहागीर आहे का? अशी विचारणा केली. भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी विकासकामांत राजकारण आणू नये, असे सांगितले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संबंधित प्रभागांतील नगरसेवकांनी काम करू नये, असे पत्र दिले असल्याने एनओसी दिली नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून पुन्हा गोंधळ झाला. ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी कुणी पत्र दिले आणि त्यात काय लिहिले आहे, ते प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी केली. 
दरम्यान, सभेला कोरम पूर्ण नव्हता. तरीही चर्चा सुरूच होती. नकाते यांनी कोरम अपूर्ण होऊन सभा तहकूब होण्यापूर्वी प्रश्‍न विचारून अधिकार्‍यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. सूर्यवंशी यांनी फक्‍त ठराव मंजूर करण्यासाठी आमचा वापर करू देणार नसल्याचे स्पष्ट केले. जयश्री चव्हाण यांनी, कोरम पूर्ण आहे, तर मग कार्यपत्रिकेवरील विषय घ्यावेत, अशी सूचना केली. एकूणच सभागृहात सत्ताधारी व विरोधकांत प्रचंड गोंधळ सुरू होता. सत्ताधारी पक्षातून उपमहापौर भूपाल शेटे, मुरलीधर जाधव, चव्हाण, उमा बनछोडे, माधुरी लाड, अशोक जाधव, तौफीक मुल्लाणी, तर विरोधकांतून विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांच्यासह आक्रमक बनले होते.

कोल्हापूर दक्षिणचे राजकारण महापालिकेत

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. सतेज पाटील व भाजपचे आ. अमल महाडिक यांच्यात राजकीय वैर आहे. येत्या विधानसभेसाठी दोघांत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. एकमेकांना खो घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचे पडसाद आता महापालिकेच्या राजकारणातही उमटत आहेत. बुधवारी झालेल्या महासभेत त्याची झलक दिसली आहे. येत्या चार महिन्यांत महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक घरातील कचर्‍याचे वर्गीकरण व्हावे : आयुक्‍त

कोल्हापूर शहरातील जयंती नाला, रंकाळा तलावसह अनेक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविणार्‍या आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे महासभेत अभिनंदन करण्यात आले. सूर्यवंशी यांनी स्वच्छ सुंदर कोल्हापूर फक्‍त कागदावरच न उतरता प्रत्यक्षात उतरावे, असे सांगितले. प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव यांनी लोकांना आपलासा वाटणार आयुक्‍त असल्याचे सांगितले. आयुक्‍त कलशेट्टी यांनी पदाधिकारी, नगरसेवकांसह सर्वांच्या सहकार्याने लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ सुरू आहे. प्रत्येक घरातील कचर्‍याचे वर्गीकरण व्हावे. कमीत कमी कचरा तयार व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहावे. 2 जूनला शहरात महास्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येकाला जयंती नाला किंवा रंकाळा परिसरात येणे शक्य नाही. त्यामुळे नगरसेवकांनी नागरिकांच्या मदतीने आपापल्या प्रभागात उपक्रम राबवावे, असे आवाहनही आयुक्‍तांनी केले.