कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये संचारबंदीतही दारू, मटका अड्डे

Last Updated: Mar 26 2020 3:27PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र

निमित्त कोरोनाचे, प्रत्यक्षात पोलिसांना थोपविण्याची युक्ती


गडहिंग्लज (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात संचारबंदी लागू केली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कडक अंमलबजावणी सुरू आहे. गडहिंग्लज शहरातही चहुबाजूंनी बॅरेकेट्स लावून पोलिसांनी प्रवेश रोखले आहेत. शहरात बाहेरून येणाऱ्या-जाणार्‍यांची चौकशी केली जात आहे. रात्रंदिवस पोलिस या कामात गुंतले आहेत. याचाच फायदा घेत शहरालगतच्या काही वसाहतींमध्ये काळेधंदे तेजीत सुरू झाले आहेत. कोरोनामुळे गल्ल्यांमध्ये कोणीही प्रवेश करू नये, यासाठी युवकांना हाताशी धरून अडथळे उभारून त्या आडून दारू, गुटखा, मटका अड्डे थाटले जात आहेत. वरकरणी गल्ली बंद केल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात पोलिसांना थोपविण्यासाठी हे अड्डे थाटल्याची चर्चा आहे.

शनिवारपासून गडहिंग्लज शहरात कडक संचारबंदी आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता हॉटेल्स, बेकर्‍या, वाईन शॉप, बीअरबार, पानटपर्‍या व इतर खासगी आस्थापना बंद आहेत. शहरात येणार्‍या सर्व प्रवेश मार्गांवर पोलिसांकडून बॅरेकेट्स लावण्यात आले असून केवळ अत्यावश्यक कामांसाठी प्रवेश दिला जात आहे. दारू दुकाने, पानटपर्‍या बंद झाल्याने मद्यपी, पिचकार्‍या मारणारे सैरभैर झाले आहेत. एरवी काही किराणा दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्याच्या पुड्याही पोलिसांच्या भीतीने पूर्णत बंद झाल्या आहेत.

या परिस्थितीचा फायदा उचलत शहरालगतच्या काही वसाहतींमधील काळेधंदेवाल्यांनी मोठी कमाई सुरू केली आहे. कोरोनामुळे गल्लीतील प्रवेश बंद करण्याच्या नावाखाली लाकूड, दगडे तर चारचाकी वाहने लावून हे मार्ग अनधिकृत बंद केले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रस्ते बंद केले असावेत, असा नागरिकांचा समज होतो. मात्र या अनधिकृत अडथळ्यांआडून वेगळाच गोलमाल सुरू आहे. 

शहरात दारू, गुटखा बंद झाल्याने या वसाहतींमधील काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू, गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी दिवसा व रात्रीच्या सुमारास मद्यपी, पिचकारी मारणार्यांचा वावर सुरू झाला आहे. शिवाय शेतवडींच्या मार्गाने शहरातही चोरीछुप्या मार्गाने हा ‘ऐवज’ पाठविला जात आहे. संचारबंदीमुळे सध्या पोलिस अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तात अडकले आहेत. काळेधंदेवाल्यांनी आपला धंदा जोमात सुरू ठेवला आहे. शिवाय अडथळे उभारल्याने पोलिस थेट पोहोचू शकणार नाहीत, याची व्यवस्थाच यांनी स्वतःच करून ठेवली आहे. कोरोनामुळे इतर व्यवसाय, उद्योग पूर्णतः कोलमडले आहेत. मात्र अशा परिस्थितीत काळेधंदेवाल्यांची मात्र चांदीच सुरू असल्याचे चित्र आहे.

अत्यावश्यक सेवांबाबत अडचणच...

संचारबंदी असली तरी नागरिकांना अत्यावश्यक सेवा खुली ठेवली आहे. वसाहतींमध्ये राहणार्‍या नागरिकांची मोठी संख्या असून दूध, भाजीपाला, औषधांसाठी शहरात जावे लागते. यातील अनेकांकडे पशुधन आहे. पशुपालकांना सकाळी, संध्याकाळी दूध घालण्यासाठी दूध डेअर्‍यांकडे जावे लागते आहे. मात्र काहींनी मनमानी उभारलेल्या या अडथळ्यांमुळे सर्वांनाच अत्यावश्यक सेवेलाही मुकावे लागत आहे. परिसरात शेतकर्‍यांच्या गवतगंज्या आहेत. उन्हाळ्यात आगीच्या घटना घडतात. अशावेळी अग्निशमन, रूग्णवाहिका सेवाही देता येणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी शहरालगतचे हे अनधिकृत अडथळे दूर करावेत, अशी मागणी होत आहे.

पोलिस गस्त वाढवण्याची गरज...

कोरोनामुळे राबविलेल्या संचारबंदीमुळे शहरात कडक अंमल सुरू असला तरी शहराबाहेरच्या वसाहतींमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. अनेक उनाडटप्पू युवक घोळ करत दंगा करत असल्याचे चित्र आहे. शेतवडींमध्ये दारू, मटक्याचे अड्डे सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.