Thu, Sep 24, 2020 11:25होमपेज › Kolhapur › भाजप-शिवसेनेची धुसफुस उघड; काँग्रेस-राष्ट्रवादीत मात्र चिडीचूप

भाजप-शिवसेनेची धुसफुस उघड; काँग्रेस-राष्ट्रवादीत मात्र चिडीचूप

Published On: Apr 29 2019 1:53AM | Last Updated: Apr 29 2019 1:41AM
कोल्हापूर : विजय पाटील 

लोकसभा निवडणूक झाली आणि भाजपच्या काही जबाबदार कार्यकर्त्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदारसंघातील युतीतील धुसफुस जाहीरपणे मांडली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरच संबंधितांचा थेट ‘बाण’ होता. हा प्रकार म्हणजे ‘कोल्हापूर उत्तर’ या विधानसभेच्या जागेसाठी सुरू असलेला सुप्‍त संघर्ष मानायला वाव आहे. दुसर्‍या बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादीत चिडीचूप दिसत असले, तरी ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. 

‘कोल्हापूर उत्तर’ हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीतील अपवाद वगळता या जागेवर सलग शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. 2004 साली काँग्रेसच्या तिकिटावर आमदार मालोजीराजे हे विजयी होऊन विधानसभेत गेले. 1995 व 1999 या दोन निवडणुकीत सलग विजयी झालेले सुरेश साळोखे यांच्याकडून हा गड मालोजीराजे यांनी जिंकून घेतला होता. 

परंतु, 2009 च्या निवडणुकीत हा गड पुन्हा आ. राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेने खेचून घेतला. आता सलग दोन निवडणुकांमध्ये आ. क्षीरसागर यांनी या मतदारसंघावर पकड मजबूत केली आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले होते. या चौरंगी लढतीत आ. क्षीरसागर यांनी 22 हजारांहून अधिक मताधिक्याने बाजी मारली. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित कदम यांनी 52 हजार मते मिळवली. भाजपचे महेश जाधव यांनी 42 हजार मते प्राप्‍त केली तर राष्ट्रवादीच्या आर. के. पोवार यांना 9 हजारांवर मते मिळाली होती.  

सध्या ‘कोल्हापूर उत्तर’च्या राजकारणाची समीकरणे खूप बदलली आहेत. कारण, लोकसभेची निवडणूक ही शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढवली आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडी व युती तुलनेने सोपी असते. कारण, लोकसभेसारख्या व्यापक मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या खूप कमी असते; पण विधानसभेचे चित्र याच्या बरोबर उलटे असते. सध्या ‘कोल्हापूर उत्तर’बाबत हेच दिसून येत आहे. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आ. क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीबाबत भाजपमधील जबाबदार मंडळींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर नाराजी व्यक्‍त केली. ही नाराजी जाहीरपणे व्यक्‍त झाल्याने याला महत्त्व आले आहे. कारण, या लोकसभा निवडणुकीत युती होण्यापूर्वी केंद्र व राज्यात सत्ता असतानाही शहरातील राजकारणात भाजप व शिवसेनेत उभा संघर्ष सुरू होता. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष किती टोकाचा आहे, हे समजून येतो. महापालिका निवडणुकीत भाजपला विरोध राहील, अशाच पद्धतीने शिवसेनेची भूमिका आजपर्यंत आहे. याचा अर्थ ती काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक राहिली आहे. भाजपनेही शिवसेनेला जिथे मात देता येईल तिथे ती दिली. पालकमंत्री आणि आमदार हा वाद तर ‘खासबाग’मध्ये कुस्ती खेळण्याचे आव्हान देणार्‍या पैलवानांसारखा सुरू होता. तूर्तास यावर पडदा पडला असे वाटत असतानाच आता पुन्हा यामध्ये ठिणगी पडली आहे. ही ठिणगी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापर्यंत कायम राहणार आहे. पालकमंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांनी एकत्रित बसून चर्चा केली तरच वाद मिटेल किंवा वाढेल, हे ठरणार आहे. 

याउलट काँग्रेस व राष्ट्रवादीतील स्थिती आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी थेट ‘आमचं ठरलंय’ म्हणत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे. आमदार पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा या मतदारसंघातील संपर्क म्हणजे ते विधानसभेेचे संभाव्य उमेदवार असतील हे सांगण्यासारखा आहे. शहरातील राष्ट्रवादीने मात्र बदललेल्या राजकारणाबाबत कसलीही ठोस  भूमिका घेतलेली दिसत नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीही आगामी काळात आक्रमक होऊ शकते, ही मात्र चर्चा आहे. आगामी विधानसभेला आघाडी झाली, तर पारंपरिक जागावाटपानुसार हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. परंतु, 2004 सालचा अपवाद सोडला, तर काँग्रेसला या जागेवर विजय मिळवता आलेला नाही, हाही मुद्दा ऐरणीवर येणारा आहे. तसेच 2004 च्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार मालोजीराजे हे राष्ट्रवादी पक्षात होते. परंतु, आघाडीच्या जागावाटपात त्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून या जागेवर उमेदवारी घेत विजय मिळवला होता, हेही वास्तव आहे.