Wed, Sep 23, 2020 21:09होमपेज › Kolhapur › एसटीच्या ढिसाळ कारभाराविरोधात गिरगावच्या विद्यार्थ्यांचे थेट बस स्थानकात आंदोलन

एसटीच्या ढिसाळ कारभाराविरोधात गिरगावच्या विद्यार्थ्यांचे थेट बस स्थानकात आंदोलन

Last Updated: Dec 13 2019 8:46PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. हा मार्ग कोल्हापूर शहराची दक्षिणेची हद्द संपल्यानंतर लागूनच असल्याने या मार्गावर नंदगाव, वडगाव तसेच गिरगाव गावांमधील भाजीपाला विकणाऱ्या तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे.

असे असतानाही एसटीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका गिरगावमधील महाविद्यालयीन तरुण तरुणींना बसत होता. त्यामुळे संतापलेल्या गिरगावमधील महाविद्यालयीन तरुणांनी संभाजीनगर बसस्थानकात जाऊन अनोखे आंदोलन केले. आगार व्यवस्थापक खाडे यांनी आंदोलनाची दखल घेत गिरगावसाठी विशेष बससह महाविद्यालयीन वेळेत दोन बस सोडण्याची ग्वाही दिली. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून आगारप्रमुखांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.

सततच्या विलंबाने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी या मार्गावरून अतिरिक्त बस सुरु करण्याची मागणी केली. या मार्गावरून अनेक विद्यार्थी एसटीच्या मासिक पासने शहरात येणारे आहेत. त्यामुळे बसेस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. प्रवाशी संख्या अधिक आणि एसटी बसेस अपुऱ्या अशी अवस्था या मार्गावर झाली आहे. त्यामुळे नंदगावमधून बस भरून आल्यास गिरगावमध्ये बस थांबवली जात नव्हती. त्यामुळे अनेकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.  

संभाजीनगर एसटी डेपोमध्ये डेपो मॅनेजर यांच्या केबीन मध्ये शाळा भरवली. तासाभरानंतर अधिकारी आले. सुमारे दोन तास ठिय्या मारल्यानंतर आगार व्यवस्थापकांनी गिरगावसाठी जादा गाडी देण्याचे कबूल केले व दुपारी दोन गाड्या महाविद्यालयीन वेळेत देण्याची तरतूद केली.

- रुपेश पाटील, संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष

 "