Tue, Sep 22, 2020 00:08होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः  हिमवृष्टीत अडकून जवानाला वीरमरण

कोल्हापूरः  हिमवृष्टीत अडकून जवानाला वीरमरण

Published On: Jan 18 2018 4:08PM | Last Updated: Jan 18 2018 4:11PMचंदगड : प्रतिनिधी

श्रीनगरपासून 50 कि. मी. अंतरावर  गुलमर्ग येथे सेवा बजावत असताना बेळेभाट  (ता. चंदगड) येथील अनंत जानबा धुरी (वय 38) या जवानाला हिमवृष्टीत अडकून वीरमरण आले. त्यांच्या  निधनामुळे तालुक्यावर शोककळा पसरली. शनिवारी बेळेभाट येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

जवान धुरी बेळगाव येथील 8 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये 1998 मध्ये भरती झाले होते. त्यांनी  बेळगाव, पुणे, राजस्थान, आसाम, दिल्ली येथे सेवा बजावली होती. सध्या ते श्रीनगर येथील गुलमर्ग येथे होते. गुलमर्ग येथे गेल्या चार दिवसांपासून तापमान उने 20 डिग्री सेल्सियस होते. त्यामुळे  थंडीची लाट होती. याचवेळी  हिमवर्षावर होत राहिला. पहाटे पाच वाजता त्यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला. अनंत यांचा विवाह 2005 साली नांदवडे येथील तुकाराम गावडे यांची मुलगी मनीषा यांच्याशी झाला.त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. 

माझा श्‍वास गुदमरतोय 

बुधवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी पत्नीस फोन केला होता. गुलमर्ग येथे कमालीचा गारठा आहे. त्यामुळे माझा श्‍वास  गुदमरतोय, मला मुलांची खूप आठवण येतेय, तुम्ही सर्वजण तब्येतीला सांभाळा, असे सांगितले होते. पत्नीनेही तुम्ही घराकडची काळजी करू नका, असे सांगतानाच फोन कट झाला होता.